होमपेज › Jalna › शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली केल्या जातात

शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली केल्या जातात

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:25AMपरतूर : भारत सवने

शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केले जात आहे. दंगली केल्या  जातात. हे बंद करण्यासाठी दंगामुक्त अभियान राबवत आहे. समाजात जातिभेद निर्माण करून तंटे लावले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, घर, शेती हे समाजाचे मूलभूत प्रश्‍न बाजूला राहून समाज भरकटत चालला आहे. मूलभूत प्रश्‍नाकडे कोणीच बोलत नाही. आज देशाला संस्कृतीची आणि सक्षम राष्ट्र निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. हिंदू-मुस्लिमांसह सर्व मानव जातीने एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत शिवचरित्रकार तथा दंगा मुक्त अभियानाचे प्रा.शेख सुभान अली यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना परतूर येथे व्यक्त केले.

गेल्या सात वर्षापासून हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रा. अली समाज प्रबोधन करीत आहेत. सात वर्षात त्यांनी 1300 व्याख्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व इतर राज्यांत दिली आहेत. 
प्रा. अली म्हणाले, या अभियानासाठी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भारतीय सेवा संघाच्या माध्यमातून आज सर्वत्र हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माणसाठी फिरत आहे. शिवाजी महाराज हे एका जाती धर्माचे नसून सर्व मानव जातीचे जगमान्य आहेत. 

मराठा आरक्षण मोर्चात मराठा समाजाच्या महिला, लहान मुले आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते, त्या मोर्चाचे डिझाईन मी बनवून दिले. मुस्लिम महिला व पुरुषांनी मोर्चात पाणी आणि फराळाचे वाटप केले. हिंदूंचे मुस्लिमाबद्दल असलेले ऐक्य आपण दाखवून दिले.

24 सप्टेंबर 2016 ला सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन रायगडावर दुसरा शिवाभिषेक सोहळा साजरा केला. यापुढे दंगलमुक्त महाराष्ट्र, दारुमुक्त महाराष्ट्र आणि हुंडामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याचा संकल्प आहे. आजपर्यंत  माझ्यासोबत अडीच हजार मुलांनी एक रुपयाही हुंडा न  घेता लग्न लावून देण्याचा संकल्प केला आहे. यापुढेही अशाच प्रकारे दहा हजार मुला-मुलींचे लग्न लावण्याचा निर्धार प्रा. अली यांनी केल्याचे सांगितले.