होमपेज › Jalna › स्वखर्चाने साडेतीन हजार रोपांचे मोफत वाटप

स्वखर्चाने साडेतीन हजार रोपांचे मोफत वाटप

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:31AMदानापूर ः प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी रमेश कंगरे यांनी स्वखर्चाने 3 हजार 350 रोपे तयार केली. ही सर्व रोपे ग्रामस्थांना मोफत वाटप केली.

शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. या मोहिमेत लोकसहभागातून शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटनाचा सहभाग दरवर्षी दिसून येतो. गावात ग्रामस्थांना सहज रोपे उपलब्ध व्हावीत या हेतूने रमेश कंगरे व पत्नी विमलबाई कंगरे दोन वर्षापासून मोफत रोपे वाटप करत आहेत. पहिल्या वर्षी जवळपास चार हजार रोपाचे वाटप त्यांनी केले. तर यावर्षी तीन हजार 350 रोपाचे वाटप त्यांनी केले  आहे.  

निसर्गावर प्रेम असलेल्या या दाम्पत्याने मानधन व रोजंदारीतून मिळणार्‍या पैशातून काही पैसे बचत करून घरातच नर्सरी तयार केली आहे. रोपांची देखभाल करण्यासाठी तसेच शेडनेट व इतर साहित्य आणि रोपे तयार करण्यासाठी लागणार्‍या पॉलिथिनसाठी 18 हजार रुपये खर्च आला. स्वतःच्या जागेवर तार कंपाउंड करून जुई धरणातून चार ट्रीप गाळ आणला. झाडांना पाणी देण्यासाठी नळ कनेक्शन घेतले. गत वर्षी सुमारे चार हजार रोपांची निर्मिती केली होती. ती रोपेही ग्रामस्थांना लागवडीसाठी मोफत वाटप करण्यात आली. तर यावर्षीही तीन हजार तीनशे पन्नास रोपांची निर्मिती करून दानापूर ग्रामपंचायत सरपंच दुर्गाबाई दळवी, बालाजी पवार व ग्रामपंचायत सदस्य शेख अब्बास यांच्या हस्ते ग्रामस्थांना मोफत रोपे वाटण्यात आले.