Mon, Mar 25, 2019 09:33होमपेज › Jalna › गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराची घोषणा कधी?

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराची घोषणा कधी?

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 19 2018 11:21PMभोकरदन : प्रतिनिधी 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार 2016-17 ची घोषणा 2 ऑक्टोबर 2017 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटूनही पुरस्काराची घोषणा झाली नसल्याने जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावर मिळालेले पुरस्कार अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. पुरस्कार मिळणार तरी कधी,  असा प्रश्‍न पुरस्कारप्राप्‍त ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. व्यापक लोकसहभागामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. कोट्यवधींची विकासकामेही पूर्णत्वास गेली. शुध्द आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्न काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचर्‍याचे व्यवस्थापन, मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केल्याचे दाखवण्यात आले. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गावांना तालुका, जिल्हा व विभागीयस्तरावर पुरस्कार घोषित झाले आहेत.

सुधारित शासन निर्णय यावर्षीपासून : तायड

जिल्ह्यातील तीन ग्राम पंचायतींना जिल्हास्तरावर मिळालेले पुरस्कार अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे पदाधिकार्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतींचा उत्साह कमी

शासन गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विविध योजना आखत आहे. मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या संत गाडगेबाबा राज्य स्तरीय पुरस्कार घोषित करण्याकडे शासन कानाडोळा करीत आहे. त्यामुळे या अभियानात नव्याने सहभागी होणार्‍या ग्राम पंचायतींमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.

पथकाकडून तपासणी

राज्यस्तरीय पथकाने गेल्या वर्षी विभाग स्तरावर प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतीची प्राथमिक पाहणी केली, मात्र अद्यापपर्यंत पुरस्कार घोषित न झाल्याने सर्वत्र नाराजी पसरली आहे.

2016 - 17  मध्ये घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खासगाव ग्राम पंचायतीला जिल्हास्तरावरील 5 लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर अंबड तालुक्यातील चिंचखेडा ग्राम पंचायतीला 3 लाखांचा व्दितीय आणि बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथील ग्राम पंचायतीला 2 लाखांचा तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी या अभियानात सुधारित शासन निर्णय आला असल्याने आता या वर्षीपासून नवीन पध्दतीने निवड होणार आहे.  -भगवान तायड, जिल्हा समन्वयक संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छत अभियान