होमपेज › Jalna › सपाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्‍लाबोल

सपाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्‍लाबोल

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:05AMजालना : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी हल्‍लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. समाजवादी पार्टीच्या वतीने नूतन वसाहत भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हल्‍लाबोल मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चकर्‍यांनी जोरदार निदर्शने करीत निवेदन दिले. या निवेदनात भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणार्‍या श्रीपाद छिंदम यांस महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करा, मुस्लिम समाजाला 10 टक्के आरक्षण द्या तसेच हज यात्रेकरूंची सबसिंडी चालू करावी, मुस्लिम समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखांचे कर्ज देण्यात यावे, शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा, शहरातील झोपडपट्टी धारकांना पी. आर. कार्ड देण्यात यावे, मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्याचे काम व तलाव सुशोभिकरणाचे काम तत्काळ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य   न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर, शहराध्यक्ष अकबर बनेखान, अब्दुल रऊफ, राहुल उघडे, संदीप साबळे, शेख फकिरा, अशोक अंबिलढगे, शेख अतिक, संदीप राठोड, नबी शिपोरकर, सतीश नवगिरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags : Jalna, Samajwadi Party, Halla Bol, District, Collectors office