Thu, Jul 18, 2019 16:50होमपेज › Jalna › भाडे घ्या, मात्र प्रवाशांना चांगली सेवा तरी द्या...!

भाडे घ्या, मात्र प्रवाशांना चांगली सेवा तरी द्या...!

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:25PMजालना ः प्रतिनिधी

एसटी महामंडळाने नुकतीच 18 टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रुपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोयी द्या, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

इंधन वाढ व कर्मचार्‍यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली, मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सीटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकार्‍यांनी बस लाल झालेली आहे. खिडक्यांचे काच फुटले आहेत.  प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटी बसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. त्यातही आता तिकीट वाढवण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा 20 ते 25 रुपयांनी तिकीट कमी आकारली जाते. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पांढरकवडा आगारातील 55 बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे, परंतु त्यापैकी आगारातील 46 बसचे छत खराब झाले असून आसनावर पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. 
वायफाय सेवाही झाली ठप्प
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विनाअडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वूट डॉट काम या नावाने वायफाय सेवा सुरू करण्यात आली, मात्र सदर वायफायसेवा बर्‍याचदा सुरू होत नसल्याचे प्रवासी सांगतात.
प्रथमोपचार पेटी गायब
अनवधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांवर प्राथमिक उपचार पेटी बसवण्यात आल्या होत्या. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही. याशिवाय अनेक बस खटारा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.