Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Jalna › नोटाबंदीमुळे रब्बीची बियाणे,औषध खरेदी लांबणीवर

नोटाबंदीमुळे रब्बीची बियाणे,औषध खरेदी लांबणीवर

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:23AMटेंभूर्णी : प्रतिनिधी

हजार व पाचशेच्या नोटा बंदचा फटका शेतकर्‍यांना विविध प्रकारे बसत आहे. कधी शेतकर्‍याच्या शेतमालाला कमी भाव मिळत आहे, तर आता बळीराजांनी रब्बीचा हंगाम जवळ आलेला असतानाही नोटांच्या तुटवड्यामुळे बियाणे, खते व औषधी खरेदी पुढे ढकलली आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडल्याचे चित्र पाहावयास आहे. 

सध्या शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी लागणारी खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडे जात आहे. पण कृषी सेवा केंद्रावर एक हजार व पाचशेच्या नोटा घेत नाही. शेतकर्‍याने दोन हजारांची नवीन नोट दिली तरी एक हजाराच्या खरेदीवर बाकी सुटे पैसे दुकानदारांकडे नसल्यामुळे शेतकरी व कृषी सेवा केंद्रचालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सध्या खरीप हंगामातील तुरीवर मोठय प्रमाणात शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल पंप, वीजबिल भरणा केंद्र, एसटी बस, रेल्वेस्थानक, दवाखाने, मेडिकल आदी ठिकाणी हजार व पाचशेच्या नोटा घेतल्या जातील असे कडक आदेश असतानासुद्धा येथे सर्व सामान्य लोकांची परवड होताना दिसत आहे. येथेही अडवणूक केली जाते. शासनाने कृषी सेवा केंद्रावर हजार व पाचशेच्या नोटा घेण्याचे आदेश दिले असते तर शेतकर्‍यांची फरफट थांबली असती.