Wed, Mar 27, 2019 04:08होमपेज › Jalna › तूर विक्रीसाठी 54 शेतकर्‍यांची नोंदणी

तूर विक्रीसाठी 54 शेतकर्‍यांची नोंदणी

Published On: Feb 12 2018 1:50AM | Last Updated: Feb 12 2018 12:26AMमाहोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील 54 शेतकर्‍यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. अद्यापपर्यत तालुक्यात शासनाकडून तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकर्‍यांना तूर बाजारात खासगी व्यापार्‍यांना बेभाव विकावी लागत आहे.

शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव 5 हजार 450 रुपये असताना बाजारात मात्र 3 हजार 800 ते 4 हजार रुपयांंपासून खरेदी होत आहे. त्यामुळे एवढ्या कमी दराने विक्री करावी लागत असल्याने तूर पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील वरूड, माहोरा, भारज बु., खासगाव, सिपोरा, टेंभूर्णी, कुंभारझरी, अकोलादेव, देळेगव्हाण परिसरात मोठ्याप्रमाणात तुरीचे उत्पादन घेतल्या जाते, परंतु परिसरात कोठेच शासकीय तूर खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी मोठी तारांबळ होत आहे. तालुक्यातील  शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात, परंतु तूर एकदा बाजारात आली की दर पडतात. यंदाही तोच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. 

गेल्या वर्षीचे विक्रमी तूर उत्पादन आणि खरेदीच्या पार्श्वभूमीवर यंदा सरकारने तुरीला बोनससह पाच हजार 450 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले दर खूपच कमी आहेत. पुढील 90 दिवस तूर खरेदी करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. परंतु अद्यापही केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून आडत बाजारातील तुरीचे भाव दिवसेंदिवस पडलेले आहेत. खासगी व्यापार्‍यांकडून अल्प दर मिळत असल्याने वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे शासनाच्या तूर खरेदी केंद्राकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान,   महाराष्ट्र  मात्र ऑनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेतच अडकला आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपये कमी दराने तुरीची विक्री करण्याची वेळ आल्याचे शेतकरी राजू जाधव यांनी सांगितले.