Tue, May 21, 2019 04:11होमपेज › Jalna › शेतकर्‍यांची पांढर्‍या सोन्याकडे पाठ

शेतकर्‍यांची पांढर्‍या सोन्याकडे पाठ

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:07AMजाफराबाद : ज्ञानेश्‍वर पाबळे 

दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा जोरदार प्रचार सुरू असतो, मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातींचा धुमधडाका सुरू केला नाही.

मागील वर्षी जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक 30 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. बोंडअळी व कापसाला मिळत नसलेल्या हमीभावाने शेतकर्‍यांनी कपाशी बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा जाहिरातबाजीवर भर असतो.गावोगावी कंपन्यांची वाहने बियाण्यांचा प्रचार करतात. शेतकर्‍यांना अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून बियाण्यांची विक्री करतात. आपलेच बियाणे कसे सरस आहे, याबाबत सर्वच कंपन्या दावा करतात. प्रचारासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अनेक ठिकाणी मोठमोठ्ठे बॅनर, होर्डिंग्ज लावले जातात. अनेक शेतकरी जाहिरातीला भुलून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र गेल्या वर्षी याच कापसावर बोंडअळीने हल्ला केला. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसारच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे यावर्षी बियाणे कंपन्यांचा प्रचाराचा धुमधडाका कुठेही दिसून येत नाही.

गेल्या वर्षी बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडले.  हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागले. बियाणे कंपन्यांवर संताप व्यक्त केला. शासनाने नुकसानभरपाईसाठी बियाणे कंपन्यांकडे बोट दाखविले. यामुळे यावर्षी सर्वच बियाणे कंपन्या धास्तावल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांच्या प्रचारावर मरगळ आली आहे. बियाणे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेल्यास मोठा अनर्थ घडण्याची धास्ती कंपन्यांच्या प्रतिनिधींना वाटत आहे. एकूणच यंदा कापसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.