Mon, Apr 22, 2019 16:05होमपेज › Jalna › प्राथमिक केंद्राचे आरोग्यच धोक्यात

प्राथमिक केंद्राचे आरोग्यच धोक्यात

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:17AMआन्वा ः प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकही कर्मचारी हजर राहत नाहीत. मोकाट कुत्र्यांचाही उपद्रव येथे वाढला असून रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने हे केंद्रच आजारी असल्याची चर्चा आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भोकरदन येथील बैठकीला गेले असता या ठिकाणी एकही कर्मचारी हजर नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी परत जावे लागते. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून रुग्णांतून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.  

शासनाने गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन सुसज्ज आरोग्य केंद्राची  उभारणी केली. त्यासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसेल तर कोट्यवधी रुपये खर्चून काय फायदा आहे, असा प्रश्‍न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. 

16 कर्मचारी

आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 16 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी बोटावर मोजता येतील इतके कर्मचारी  मुख्यालयी राहत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मुख्यालयी न राहणारे कर्मचार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

निवासस्थानी नाही

या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांसाठी लाखो रुपये खर्च करून निवास बांधकाम करण्यात आले आहे, परंतु काही निवासस्थाने असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयाच्या निवासस्थानात न राहता दुसर्‍या ठिकाणावरून ये-जा करत असल्याने रात्रीच्या वेळी येणार्‍या रुग्णांना उपचारासाठी सिल्लोड किंवा भोकरदन येथे जावे लागत आहे. मोकाट कुत्र्यांचा उच्छादया आरोग्य केंद्रात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने चक्‍क आरोग्य केंद्रात कुत्र्यांनी अस्वच्छता केली आहे.