Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Jalna › पर्यटनाचा नियोजनबद्ध आराखडा शासनास सादर करा : लोणीकर

पर्यटनाचा नियोजनबद्ध आराखडा शासनास सादर करा : लोणीकर

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:25AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव आहे.  रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेले पर्यटनक्षेत्र जिल्ह्यात विकसित करण्यासाठी पर्यटनाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नांगरतास, शंभू महादेव व  गोखुरेश्‍वर पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री  लोणीकर बोलत होते. यावेळी आ. संतोष दानवे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  निमा अरोरा, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, तहसीलदार बिपीन पाटील, राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

     पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पर्यटन क्षेत्राच्या विकासामुळे राज्यातील अनेक शहरांचे महत्त्व वाढून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शहराशेजारी असलेल्या औरंगाबाद येथे पर्यटनाच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात इतर राज्यांतील पर्यटकांसह परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.  जालना जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून जिल्ह्यात पर्यटनक्षेत्र विकसित केल्यास औरंगाबाद येथील पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनाकडे आकर्षित करता येणे शक्य होणार आहे. या पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील 22 ठिकाणांची पर्यटन क्षेत्रासाठी निवड करण्यात आली असून या ठिकाणी ही गावे पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी आवश्यक असणारा निधी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.