होमपेज › Jalna › लोकसभेच्या गडासाठी दानवे-खोतकरांची मोर्चेबांधणी 

लोकसभेच्या गडासाठी दानवे-खोतकरांची मोर्चेबांधणी 

Published On: Apr 26 2018 2:01AM | Last Updated: Apr 26 2018 12:00AMजालना : सुहास कुलकर्णी

लोकसभेचा गड सर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह शिवसेनेचे राज्यमंत्री यांनी एकमेकांवर आरोपाचे कागदी बाण सोडून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. दानवे हे लोकसभेच्या रिंगणात निवडणुकीपूर्वीच दंड थोपटत असतानाच राज्यमंत्री खोतकर यांनीही निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरण्याची सुरुवात केली आहे.लोकसभेच्या निवडणुका 2019 मध्ये होणार हे लक्षात घेऊन भाजपचे खासदार दानवे यांनी विरोधी उमेदवार कोण यांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दानवे व खोतकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व सुरू झाले आहे. खोतकर यांच्याभोवती  मतदारसंघात शिवसेना की काँग्रेस या  संशयाचे वलय निर्माण करण्यात दानवे यांना यश आले आहे. काँग्रेस निष्ठावान नेत्यांमध्ये खोतकर यांच्याविरोधात पक्षांतर्गत वाद निर्माण करून त्यांना एकटे पाडण्याची खेळी दानवे खेळू शकतील. 

खोतकर निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्यास त्यांच्याविरोधात निष्ठावान काँग्रेसी नेत्यांचा चक्रव्यूह लावून त्यात त्यांना अडकवले जाणार आहे. एकीकडे अंतर्गत  बंडखोरीचा सामना करतानाच दुसरीकडे दानवे यांच्याशी दोन हात करताना खोतकरांची दमछाक होणार आहे. दानवे या लोकसभा मतदारसंघातून चार वेळेस निवडून गेलेले असल्याने त्यांची मतदारसंघात सर्वदूर ओळख व मजबूत पकड आहे. मात्र असे असले तरी दानवे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांचा मतदारसंघाशी असलेला संपर्क पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. मोदी यांच्या बाजूची लाट 2014 प्रमाणे 2019 च्या निवडणुकीत कोठेही नसल्याने त्याचा फटका दानवे यांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

मराठा आरक्षण, शेतीमालाचे भाव, धनगर आरक्षण यांसह जीएसटी, नोटाबंदी या मुद्द्यांमुळे दानवेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता असली तरी दानवेंनी  विपरीत परिस्थितीवर मात करून अनेकदा विजय मिळवला आहे. निवडणूक जिंकण्याचे तंत्र व कसब त्यांच्याकडे आहे. संपूर्ण मतदारसंघात भाजपची शिस्तबद्ध यंत्रणा आहे. सत्तेत आल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाने कोणतेही मंडळ अथवा महत्त्वाची पदे न मिळाल्याने हा रोष  भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांत गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत आहे.

Tags : Jalna, Preparation, Lok Sabha, election