Sun, Mar 24, 2019 16:11होमपेज › Jalna › महा ई-सेवा केंद्रांकडून लूट

महा ई-सेवा केंद्रांकडून लूट

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:51PMमंठा ः प्रतिनिधी 

खरीप हंगामाचा पीक विमा काढण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. त्यामुळे सध्या पीक विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. बँकेसह महा-ई-सेवा केंद्रांवर शेतकर्‍यांची एकच गर्दी होत असल्याने याच गर्दीचा फायदा घेऊन शहरातील तलाठ्यांनी ठरवून दिलेली ऑनलाइन व झेरॉक्स सेंटरवर शेतकर्‍यांची लूट होत आहे.संबंधितांनी होणारी लूट थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

शासनाने खरीप हंगाम 2018-19 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत सर्व अधिसूचित पिकांकरिता बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी 24 जुलै आहे. कर्जदार शेतकर्‍यांना पीक विमा बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांना  ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. कर्जदार शेतकर्‍यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2018-19 मध्ये जिल्ह्यात राबविण्याकरिता इन्श्यूरन्स कंपनी नियुक्‍त करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत सात पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणा शेतकर्‍यांच्या मुळावर येऊ नये म्हणून विमा संरक्षण देण्यात आले आहे. विमा भरण्याची मुदत जवळ येत असल्याने शेतकरी विमा भरण्यासाठी लागणार्‍या कागदोपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.विमा भरण्यासाठी लागणार्‍या होल्डिंग व सातबारासाठी ऑनलाइन व झेरॉक्स केंद्रांवर गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन शासकीय गोदामांसमोर व कन्या शाळेच्या पाठीमागे ऑनलाइन व झेरॉक्स केंद्रचालक शेतकर्‍यांची आर्थिक लूट करत आहेत.

तलाठी आपली स्वाक्षरित कागदे आपल्या संबंधित ऑनलाइन व झेरॉक्स केंद्रांवर ठेवतात. तेथेच शेतकर्‍यांना घेण्यासाठी सांगतात.त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना जास्त पैसे देऊन होल्डिंग व सातबारा खेरदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक शोषण केले जात आहे. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, नसत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईलख, असे उदय बोराडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.