Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Jalna › समृद्धी इंटरचेंज लढ्यात पाटकर यांची उडी

समृद्धी इंटरचेंज लढ्यात पाटकर यांची उडी

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMजालना : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर समृध्दी महामार्गातील इंटरचेंज पॉइंटवरून दोन महिन्यांपासून रणकंदन सुरू आहे. इंटरचेंज आंदोलनात समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीकडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आंदोलन करणार असल्याने हा मुद्दा आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहे.

रस्ते विकास महामंडळाच्या वतीने समृध्दी महामार्गातील इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ)  प्रारंभी जालना-देऊळगावराजा रस्त्यावर (जामवाडी, श्रीकृष्णनगर आणि पानशेंद्रा शिवारात) होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांना हा पॉइंट जालना-भोकरदन रस्त्यावर हलविला (गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी शिवार) होता. हा प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉइंट स्थलांतर करण्याचा हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेने दोन महिन्यांपासून विविध आंदोलनामुळे वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या (गुंडेवाडी, तांदूळवाडी, जामवाडी) लढ्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी दिली. या संदर्भातील लढ्याचे पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी शनिवारी (दि.10) रोजी श्रीमती पाटकर यांच्यासोबत शाहदा (जि.धुळे) येथे बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.    

जिल्ह्यातील बावीस गावांतून जाणार्‍या समृध्दी महामार्गातील इंटरचेंज पॉइंटसाठी एमएसआरडीसीने प्रारंभी जालना-देऊळगावराजा रस्त्यावरील श्रीकृष्णनगर, जामवाडी आणि पानशेंद्रा शिवारातील शेतजमिनीची पाहणी केली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी इंटरचेंजसंदर्भात जामवाडी येथे बैठक ही घेतली होती. या ठिकाणी इंटरचेंज होणार असल्याची चर्चा सुरू होती. कालांतराने हा इंटरचेंज पॉइंट जालना-भोकरदन रस्त्यावर (गुंडेवाडी, तांदूळवाडी, जामवाडी) प्रस्तावित करण्यात आला. गत तीन महिन्यांपासून प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉइंट खादगाव, निधोना शिवारात स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या झाल्याने संबंधित शेतकरी आक्रमक झाले आहे.  इंटरचेंज पॉइंट जालना-भोकरदन रस्त्यावर होण्यासाठी गुंडेवाडी, जामवाडी आणि तांदूळवाडी शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर जालना-देऊळराजा रस्त्यावर हा पॉइंट करण्याच्या मागणीसाठी जामवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला.  

इंटरचेंज पॉइंटसाठी शेतकर्‍यांत संघर्ष 

समृध्दी महामार्गातील इंटरचेंज पॉइंट कोणत्या ठिकाणी होणार हे अद्याप निश्‍चित नसल्याचे अधिकारी सांगत आहे, परंतु एका जागेवर, दुसर्‍या जागेवर आणि तिसर्‍या जागेवर स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकर्‍यांत संघर्ष सुरू झाला आहे. यामध्ये तीन गट पडले असून पहिला गुंडेवाडी, तांदूळवाडी, जामवाडी दुसऱा गट श्रीकृष्णनगर, जामवाडी, पानशेंद्र आणि तिसरा गट खादगाव, निधोना असा आहे.