Wed, Jul 17, 2019 16:01होमपेज › Jalna › जाफराबादेत पालकांचे उपोषण

जाफराबादेत पालकांचे उपोषण

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:15AMजाफराबाद :  प्रतिनिधी 

येथील उर्दू  जिल्हा परिषद  शाळेतील पालकांनी पाल्यांना    शाळेत संगणक शिक्षण मिळावे या मागणीसाठी गटसाधन  कार्यालयासमोर बुधवार, 27 जून रोजी सकाळी उपोषण केलेे. दुपारी 2 वाजता रामधन कळंबे यांनी  पालकांना लेखी आश्‍वासन  दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. 

शहरात जिल्हा परिषद शाळा एकच असली तरी जागेअभावी उर्दू माध्यमाची शाळा ही किल्ला परिसरात भरते, तर मराठी माध्यमाची शाळा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत भरते. आयसीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी  शासनाकडून विद्यार्थी संख्येनुसार शाळांना संगणक दिले जातात. त्याकरिता  एक स्वतंत्र वर्गखोलीसुद्धा असते. जाफराबाद जिल्हा परिषद प्रशाळेच्या मराठी माध्यमासाठी 12 संगणक देण्यात आले ,  परंतु उर्दू माध्यमाला 6 संगणक देण्यात यावे, यासाठी पालकांनी 19 जून रोजी लेखी पत्र दिले होते, परंतु यावर काहीच कार्यवाही न झाल्याने पालक बुधवारी सकाळी उपोषणास बसले. त्यानंतर रामधन कळंबे यांच्या मध्यस्थीने पालकांनी मराठी माध्यमाच्या  मुख्याध्यापकांकडून 5 जुलै रोजी संगणक मिळेल, अशा आशयाचे लेखी पत्र घेतल्यानंतर उपोषण सोडले. 

यावेळी रियाज मौलाना, शेख अकील, विलास कोल्हे, हारेस खान, सय्यद रोशन, शेख मोहसीन, हाफीज मतीन यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.