Thu, Sep 19, 2019 03:46होमपेज › Jalna › उघड्यावर प्रसूती, अधिकार्‍यांना धरले धारेवर

उघड्यावर प्रसूती, अधिकार्‍यांना धरले धारेवर

Published On: Sep 07 2018 12:56AM | Last Updated: Sep 07 2018 12:56AMजालना ः प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव आरोग्य केंद्राबाहेर कर्मचारी नसल्याने महिलेची उघड्यावर प्रसूती झाल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांना   धारेवर धरले. 

यावेळी झालेल्या जोरदार वादानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,  या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह डोणगावच्या प्राथमिक आरोग्य अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, आरोग्य सभापती रघुनाथ तौर, कृषी सभापती जिजाबाई कळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जयमंगल जाधव यांनी जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकार्‍यांसह सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने महिलेची प्रसूती उघाड्यावर झाल्याचे सांगत या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी खुलासा करावा अशी मागणी केली. यावेळी डॉ गिते यांनी या आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आजारी  रजेवर गेल्याचे सांंंंगितले. यावर सदस्य शालिकराम म्हस्के यांनी वैद्यकीय अधिकारी आजारी गेल्याचे सांगत असले तरी ते टेंभुर्णी येथील त्यांच्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर नियमित उपचार करीत असल्याचा आरोप केला. यापूर्वी अनेकदा आरोग्य विभागाच्या कारभारावर सदस्यांनी आरोप केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची चौकशी का करण्यात येत नाही?असा प्रश्‍न यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.