Mon, Apr 22, 2019 11:57होमपेज › Jalna › केवळ 45 टक्के कर्जाचे वाटप !

केवळ 45 टक्के कर्जाचे वाटप !

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 25 2018 11:47PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यामध्ये केवळ 45 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे 80 टक्के तालुक्यांत ही परिस्थिती आहे. तालुक्यातील विविध बँका सहकार्य करीत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या खरिपात रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. पुनर्वसू नक्षत्रानेही शेतकर्‍यांची निराशा केल्याने बळीराजा धास्तावला आहे. भोकरदन तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामातील 46 हजार 921 शेतकर्‍यांसाठी 233 कोटी 77 लाख रुपयांचे लक्षांक आहे. यापैकी सध्या खरीप हंगाम असल्याने याच हंगामासाठी 20 हजार 715 शेतकर्‍यांना 71 कोटी 89 लाख 4 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

तालुक्यातील ग्रामीण बँकेच्या चार शाखांमधून 2 हजार 917 शेतकर्‍यांना 17 कोटी 83 लाख 11 हजार रुपयांचे वाटप करून जवळपास 57 टक्क्यांपर्यंत वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 13 हजार 458 शेतकर्‍यांसाठी 22 कोटी 20 लाख रुपयांचे लक्षांक ठेवण्यात आले आहे. यापैकी या बँकेतील कर्जवाटपाचा विचार केला तर केवळ या बँकेेने सुरुवातीपासूनच पीक कर्ज वाटपासाठी चांगले काम केल्याचे दिसत आहे. 6 हजार 758  शेतकर्‍यांना 11 कोटी 58 लाख 88  हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याचे बँकेतून सांगण्यात आले. या बँकेने 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज वाटप करून बाजी मारली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार शाखांमधून 2 हजार 232 शेतकर्‍यांना 14 कोटी 58 लाख 71 हजार तर एसबीआयच्या तीन शाखांमधून 1 हजार 780 शेतकर्‍यांना 13 कोटी 86 लाख 72 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. इतर बँकांनीही कर्जवाटप तत्काळ करण्याची मागणी होत आहे.