Sun, Nov 18, 2018 00:42होमपेज › Jalna › शाळा स्तरावरून मिळणार आता गणवेश

शाळा स्तरावरून मिळणार आता गणवेश

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 11:10PMजालना : प्रतिनिधी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश आता  शाळा समिती स्तरावरून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान देण्याचा यापूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. अनुदानऐवजी गणवेश देण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने 28 जूनला हा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 700 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुले-मुली, सर्व मुली, एससी-एसटी तसेच बीपीएल मुले आदी, जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 700 विद्यार्थी गणवेशाकरिता पात्र ठरले आहेत. पालकांनी गणवेश खरेदी केल्याची पावती मुख्याध्यापकाकडे दाखवल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने घेतला होता. मात्र गणवेशाच्या अनुदानाचा निधी जिल्हास्तरावर वितरीत केला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाविना शाळेला यावे लागले. 

मात्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेने पूर्वीचा निर्णय रद्द करत शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर गणवेश खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी आता शाळा व्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित केला जाणार आहे. गणवेशाचा रंग तसेच संपूर्ण ड्रेसकोड ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी थेट लाभ हस्तांतरणाची अट शिथिल केली. विद्यार्थ्यांना तत्काळ गणवेश देणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वाटप, आदी बाबी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठरवायचे आहे.