Mon, Apr 22, 2019 06:28होमपेज › Jalna › आता उर्दूतूनही मुले साहित्य शिकणार

आता उर्दूतूनही मुले साहित्य शिकणार

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 1:41AMजालना : प्रतिनिधी

जून 2015 पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू झाले, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक वातावरणासोबतच शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. तीन वर्षांपूर्वी  राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना हक्‍काचे व्यासपीठमिळावे, या हेतूने ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाद्वारे राज्यस्तरावर उपक्रमशील शिक्षकांचे स्टॉल्सद्वारे इतर शिक्षकांना प्रेरित करण्याचे काम केले. मात्र ‘शिक्षणाची वारी’ ही संकल्पना फक्‍त मराठी भाषिक मुलांपुरती व शिक्षकांपुरती मर्यादित होती. मात्र यावर्षी औरंगाबाद 10 ते 12 मार्च दरम्यान उर्दू शिक्षकांसाठी ‘शिक्षणाची वारी’चे आयोजन करण्यात आले होते. यात तीन स्टॉल्स लावले होते.त्यामुळे आता उर्दूतूनही मुले साहित्य शिकणार आहेत.

जिल्ह्याचा महत्त्वाकांक्षी असा अध्ययन स्तर निश्‍चितीचा उपक्रम सध्या राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. याची उर्दूतून माहिती देणारा स्टॉल उर्दू प्राथमिक शाळा सिंधी काळेगाव येथील उपक्रमशील शिक्षक जावेद खान यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे मार्गदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यात इलियास मोइमोद्दीन, शेख हबीब, शेख नवाज, अकिल शहा हे शिक्षक होते. 

अध्ययन स्तर निश्‍चिती या उपक्रमात मुलांचा अध्ययन स्तर उंचाविण्यासाठी विविध शैक्षणिक साधनांचा उपयोग करून मुलांना अध्ययनक्षम करण्याचे काम केले जाते. मराठीतून असणारी विविध शैक्षणिक साधने उर्दूतून करून त्यांचे सादरीकरण या ठिकाणी केले. मुलांची गणिताविषयीची भीती दूर करण्यासाठी तारेख अहेमद यांनी विविध गणितीय साहित्य तयार करून मुलांना सहज व सोप्या पद्धतीने गणित आकलन कसे होईल, हे सांगितले आहे. सोबतच गणितातील अनेक अवघड संकल्पना शैक्षणिक साहित्यांद्वारे सोप्या करून दाखविल्या आहेत. 

तिसरा स्टॉल होता डीआयईसीपीडी जालना यांचा. यात शेख फय्याज, अब्दुल गफ्फार, कमालोद्दीन, अब्दुल रहेमान, शेख मुजाहिद यांनी अध्ययन स्तर निश्‍चिती उपक्रमासंदर्भात जिल्हाहित सुरू असलेले काम व उर्दू माध्यमांच्या शिक्षकांसाठी व मुलांसाठी उपयुक्‍त ठरतील, असे साहित्य तयार केले होते. राज्यभरातील हजारो शिक्षकांनी या तीनही स्टॉलला भेटी देऊन जिल्ह्याचे कौतुक केले.