होमपेज › Jalna › रेशनसाठी धावून येणार ‘नॉमिनी’

रेशनसाठी धावून येणार ‘नॉमिनी’

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:56PMजालना ः अप्पासाहेब खर्डेकर 

आधार कार्ड आहे. त्यामुळे आधारच्या सर्व्हरवर आपसूकच बोटांच्या ठशांची नोंदही झाली आहे. दरम्यानच्या काळात अनेक वर्षे लोटल्यामुळे बोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदी करण्याच्या पॉइंट ऑफ सेलवर (पॉस) संबंधितांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने नॉमिनी नियुक्‍त केले असून, त्यांच्या आधारे संबंधितांना धान्य पुरवठा केला जात आहे.

गावांतील नामांकित व्यक्‍तींच्या खांद्यावर नॉमिनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतरच संबंधित वृद्धांना धान्य दिले जाते. गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशा मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. अर्थात संबंधित वृद्ध कार्डधारकांच्या वतीने नॉमिनीच्या बोटांचा ठसा उमटवूनच पॉसची प्रक्रिया पार पाडली जाते. जालना जिल्ह्यात 3 लाख 21 हजार रेशनकार्ड आहेत. या कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. यापैकी काही कार्डधारक जख्खड म्हातारे आहेत. त्यांचे रेशन कार्ड अंत्योदय आणि प्राधान्य गटातील असल्यामुळे त्यांना शासनातर्फे गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा केला जातो. पूर्वी हा पुरवठा पावत्या फाडून केला जायचा. हल्ली तो पॉस मशीनच्या साहाय्याने केला जातो. या मशीनवर बोटांच्या ठशांच्या आधारे रेशनकार्डधारकाला आपली ओळख पटवावी लागते. 

बोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे वृद्धांच्या बोटांचे ठसे जुळत नाही आणि ठसे जुळत नाहीत म्हणून त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. जिल्ह्यातही असे काही नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर नॉमिनीच्या आधारे त्यांना धान्य पुरवले जात आहे.

2200 नागरिकांना लाभ 

बोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदीच्या पॉइंट ऑफ सेलवर (पॉस) त्यांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील 2 हजार 200 लाभार्थींना नॉमिनीचा लाभ मिळाला आहे. कुणाही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच नॉमिनीची नियुक्मी करण्यात आली.  - राजीव नंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी