Fri, Jul 19, 2019 22:14होमपेज › Jalna › निपाहपासून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज

निपाहपासून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 25 2018 11:54PMजालना : प्रतिनिधी

भारतात काही राज्यात आलेल्या निपाह हा आजार जीवघेणा असून, त्यापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. वटवाघळांपासून या आजारांच्या विषाणूंचे संक्रमण होत आहे. महाराष्ट्रात या आजाराचे लक्षण आढळत नसले तरी सतर्कता बाळगण्याचे आवाहन डॉ. राजेश सेठिया यांनी केले. जालना शहरातील जुना जालना भागात मोठ्या प्रमाणात वटवाघळांची संख्या असून, नागरिकांनी सावधगिरी बाळण्याचे सेठिया यांनी सांगितले.

निपाह आजारासंदर्भात डॉ. सेठिया म्हणाले की, 1998 मध्ये मलेशियातील निपाह गावात हा आजार आढळला. त्यामुळे या आजाराचे नाव निपाह पडले. त्यावेळी सुमारे 11 लाख  नागरिकांचा मृत्यू झाला होता. हजारो जनावरांचाही यात मृत्यू झाला होता. 2001 मध्ये भारतात निपाह आजार आढळून आला. पश्‍चिम बंगालमधील सिलीगुडी येथे 72 लोकांना याची लागण झाली त्यापैकी 42 जणांचा मृत्यू झाला होता. 2007 मध्ये नादिया येथे या आजारामुळे 5 जणांचा मृत्यू झाला होता. वटवाघळांने खालेली फळे, त्यांच्या विष्टेमुळे निपाह पसरत आहे. सोबतच डुकरांमधूनही या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे सेठिया यांनी सांगितले. महाराष्ट्रात अथवा जालना जिह्यात  निपाहचे लक्षण नसले तरी काळजी आणि जनजागृती करावी.

जुन्या जालन्यात वटवाघळांची संख्या जास्त : जुना जालना भागातील गणपती गल्‍ली, आनंदीस्वामी गल्‍ली, कसबा तसेच काही जुन्या वाड्यांमध्ये वटवाघळांची निवासस्थाने आहेत. सायंकाळनंतर शेकडो वटवाघळे परिसरात गिरट्या घालत असल्याचे दररोजचे चित्र असते.