Wed, Apr 24, 2019 21:45होमपेज › Jalna › साहित्याचा कसदार बियाणे असलेला जिल्हा : हबीब

साहित्याचा कसदार बियाणे असलेला जिल्हा : हबीब

Published On: Jan 29 2018 12:59AM | Last Updated: Jan 29 2018 12:58AMजालना ः प्रतिनिधी

 जिल्हा आतापर्यंत कसदार बियाणे उत्पादनाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता; परंतु यापुढे हा जिल्हा बियाणांबरोबरच साहित्याचे कसदार बियाणे असलेला हा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे, असे प्रतिपादन कॉ. अमर हबीब यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते  बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष ललित अधाने, अविनाश पाटील, स्वागताध्यक्ष शाम शिरसाट, गझलकार सुनंदा पाटील, दत्ता बारगजे, डॉ. प्रताप जाधव, अच्युत मोरे, साहिल पाटील, शाहीर आप्पासाहेब उगले यांची उपस्थिती होती.

हबीब म्हणाले की, साहित्यिकांनी सृजनांचा वाली झाले पाहिजे, त्यांच्याबद्दल लिहिले पाहिजे. या देशात स्त्रिया आणि शेतकरी हे संकटात सापडलेले आहेत. त्यांच्या न्याय हक्‍कांसाठी लढा देण्याची गरज आहे. साहित्यिकांनी भाषा नीट समजून घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांचे वाचन महत्त्वाचे असते. शेतकरी व स्त्री फारसे बोलू शकत नाहीत, त्यामुळे साहित्यिकांनी त्यांचे शब्द होण्याची गरज आहे. हे शब्द व्यक्‍त करण्यासाठी अशा प्रकारचे संमेलने होणे महत्त्वाचे असते. तुमच्यातले माणूसपण जागे झाल्याशिवाय खर्‍या साहित्याची निर्मिती होत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी डॉ. अधाने म्हणाले की, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या त्रीगुणांनी जो युक्‍त असतो त्याला युवाअसे म्हणतात. युवा  जेवढा बलशाली व तेजस्वी असतो तितकाच तो अंत:करणाने कोमल असतो. जगातील सर्व क्रांतिकारक बदल युवकांनी घडवून आणले आहे. 

बालकांच्या हाताने ग्रंथपूजन करून नवा पायंडा

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी काढताना ग्रंथपूजा ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते; परंतु नवोदित मराठी साहित्य संमेलनात ग्रंथपूजा बालकांच्या हाताने करून एक नवा पायंडा पाडला आहे. बालकांनी या ग्रंथाची मनोभावे पूजा करून वाचन केले तर उद्याची पिढी आदर्शवादी पिढी घडेल, असा अशावाद व्यक्‍त करण्यात आला.

पोतराज आणि वासुदेव ठरले आकर्षण

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत पोतराज आणि वासुदेव हे आकर्षण ठरले, तर विविध वेशभूषा आणि देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष आकर्षित केले होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलनाचाही संदेश देण्यात आला. यावेळी जिभेतून त्रिशूळ आरपार घालण्याचा प्रयोग सादर करण्यात आला. तसेच यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीत सहभागी महिला आणि पुरुषांनी फुगडी खेळून आनंद व्यक्‍त केला. ही फुगडी शहरवासीयांचे आकर्षण ठरले.