Fri, Sep 21, 2018 00:39



होमपेज › Jalna › ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:30PM



घनसावंगी : प्रतिनिधी 

हल्लीच्या विज्ञानयुगात भ्रमणध्वनीच्या गजराने सुरू होणारी पहाट पूर्वीच्या काळी नंदीबैलाच्या गुबूगुबूने होत असे़ काळानुरूप या बाबी आता दुर्मिळ होत चालल्या असतानाच नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणार्‍यांनी तीन तीन पिढ्या या व्यवसायात खर्ची घातल्यानंतर त्यांची पुढची पिढी शिक्षणाकडे वळवली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे नंदीबैल आल्याने मुलांमध्ये अनंदाचे वातावरण पाहयला मिळाले. 

घनसावंगी तालुका हा ग्रामीण भागात मोडतो. तालुक्यात पूर्वी सकाळच्या प्रहरी गावातील चौकाचौकांत गुबूगुबूचा आवाज करीत महादेवाचा नंदी आला, हो. सदा-शिवाचा नंदी आला, स्वर्गपातावून नंदी आला, कैलासाहून नंदी आला, कोण्या सुदैवाच्या वाड्यात नंदी चालला  हा आवाज कानी पडताच  घरातील बालगोपांळासह आबालवृद्धांची पावले अंगणाकडे नंदीबैलाला पाहण्यासाठी आपसुकच वळायची़, मात्र काळाच्या ओघात सध्या नंदीबैल दिसेनासे झाले आहे. आधुनिकतेच्या जमान्यात नंदीबैल ही संस्कृतीच लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे़ साधारणपणे खरीप हंगाम आल्यावर नंदीबैल गावात येत होते़ आपल्या धन्याच्या इशार्‍यावर मान डोलावून नागरिकांचे भविष्य सांगणार्‍या नंदीबैलावर जनतेची अपार श्रद्धा होती़  घरातील सुवासिनी सुपात धान्य आणून नंदीबैलाचे औक्षण करायच्या.

शिल्लक धान्य त्यांच्याच झुलीला शिवलेल्या खोळीत टाकीत नंदीबैलवाला कुळाचा उद्धार आणि सर्वांनाच चांगल्या आरोग्याची व भरभराटीची मागणी करायचा. गावातील बालगोपाळ तर नंदीबैल गावात असेपर्यंत त्याच्या शेपटीला चिटकलेले दिसून येत़ सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय असे प्रश्न विचारल्यावर भोलानाथही अदबीने मान डोलावत प्रतिसाद देत असे़ सध्याच्या औद्योगिकीकरणाने विकसित झालेल्या समाजात नंदीबैलाचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे़ महागाईच्या जमान्यात नंदीबैलाच्या व्यवसायावर स्वत:सह कुटुंबाची गुजराण होत नसल्याने अनेकांनी परंपरागत चालू असलेल्या या व्यवसायाला मूठमाती दिली आहे़ पूर्वीच्या काळी शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य पिकत असल्याने नंदीबैल व त्याच्या मालकाकडे वर्षभर पुरेल इतके धान्य जमा होत असे़  आता तर जनतेलाच खरेदी करून धान्य वापरावे लागत असल्याने आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येईल, अशी गत झाल्याने नंदी बैलवाल्यांचा व्यवसायही काळाच्या पडद्याआड गेला आहेत़