Sun, Apr 21, 2019 04:11होमपेज › Jalna › ‘आत्मा’ योजना बंद करण्याच्या हालचाली  

‘आत्मा’ योजना बंद करण्याच्या हालचाली  

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:19AMजालना : प्रतिनिधी

शासनस्तरावर  ‘आत्मा’ योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू असून ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संतोष आळसे यांच्या पाठोपाठ  प्रकल्प उपसंचालक अनिलकुमार हदगावकर व दत्तात्रय दिवटे यांच्याही बदल्या झाल्या आहेत. 

जिल्ह्यात अद्याप नव्याने प्रकल्प संचालक आणि प्रकल्प उपसंचालकांची पदे भरण्यात न आल्याने ‘आत्मा’चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याची चर्चा होत आहे. आत्मा यंत्रणेत अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी येत नसून आता  केवळ कंत्राटी कर्मचारी कारभार पाहात असल्याचे दिसत आहे.   जिल्ह्यामध्ये कृषी  विभागाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन  यंत्रणा आत्मा या यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी गट, शेतकरी उत्पादक  कंपन्याची निर्मिती झाली आहे. शेतकर्‍याना कृषी व सलग्न विभागामार्फत आत्मा  यंत्रणेद्वारे प्रशिक्षण, अभ्यास दौरे, शेतीशाळा, किसान गोष्टी, कृषी मेळावे, कृषी प्रदर्शने  अशा वेगवेगळ्या उपक्रमातून  मार्गदर्शन करण्यात येते. प्रकल्प  संचालक व प्रकल्प उपसंचालक यांच्या बदलीने ही यंत्रणा खिळखिळी झाली आहे. जिल्ह्यात 2500 पेक्षा जास्त शेतकरी गटांची तसेच  30 शेतकरी उत्पादक कंपन्यांची  निर्मिती आत्माने केली  आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमातून बीज प्रक्रिया उद्योग, केळी चिप्ससारखे उद्योग   शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.