होमपेज › Jalna › गौण खनिजाचा बेसुमार उपसा

गौण खनिजाचा बेसुमार उपसा

Published On: Aug 14 2018 1:28AM | Last Updated: Aug 14 2018 1:22AMमंठा : प्रतिनिधी 

तालुक्यातील उस्वद, नळडोह परिसरात ठिकठिकाणी गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले जात आहे. माफिया डोंगरच्या डोंगर पोखरत असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत आहे. शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी होत आहे.

वाळू व मुरूम उत्खननाकडे महसूल व वन विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्‍त केला जात आहे. महिन्यापासून उस्वद व नळडोह परिसरातून दिवसा सुटीच्या दिवशी पूर्णा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा साठा उत्खनन करून अवैधरीत्या विदर्भात मार्गी लावला जात आहे. त्याचबरोबर मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे. नळडोह परिसरातील टेकडीवरून शेकडो ब्रास मुरूम जेसीबीच्या साहाय्याने टिप्पर व टॅक्टरने उचलला जात आहे. काही वाळूमाफियांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने प्रशासनालाही कारवाई करण्यास अडचण येते, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

संबंधितांची धृतराष्ट्राची भूमिका

परिसरात होत असलेल्या वाळू व मुरूम उपसा उत्खनन माफियाकडून मनमर्जीप्रमाणे होताना दिसत आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत असून मोठमोठे डोंगर पोखरल्यामुळे भुईसपाट झाले आहेत. यांच्यावर कारवाई व्हावी, असा सूर निसर्गप्रेमींकडून होत आहे.

चेलेचपाटे ठेवतात पाळत 

गौण खनिज तस्करांनी पोसलेले काहीजण कुणी कारवाई करण्यासाठी तर आले नाही,  यासाठी दिवसभर घटनास्थळावर पाळत ठेवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यांच्याकडून तत्काळ माहिती अवैध उत्खनन करणार्‍यांपर्यंत वाळू, मुरूम माफियांना व वाहनचालकांपर्यंत पोहोचते, हे विशेष ! 

कारवाईसाठी पथक

तालुक्यात होणार्‍या गौण खनिजाच्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून कारवाई करण्यात आले आहेत. तसेच आढळल्यास पुढेही योग्य ती कारवाई करण्यात येईल. - सुरेखा कोटूरकर, नायब तहसीलदार, मंठा