जालना : प्रतिनिधी
जालना शहरात आयोजित करण्यात येणारा जालना महोत्सव यशस्वी करून जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. या वेळी या महोत्सवातून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न संयोजकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जालना शहरात 18 ते 22 मेदरम्यान आयोजित करण्यात येणार्या जालना महोत्सव 2018 च्या पूर्वतयारीची आढावा बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, घनश्याम गोयल, सुभाष देविदान उमेश पंचारिया, गोविंदप्रसाद मुंदडा, सुदेश करवा, विरेंद्र धोका आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, मागील अनेक वर्षांनंतर शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे. जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून या माध्यमातून त्यांना आपली कला सादर करता येणार आहे.
त्याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या गुरूंना या कार्यक्रमात सहभागी करून घेत एक आपलेपणाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत हा महोत्सव यशस्वी होऊन जिल्ह्याचे नाव देशपातळीवर जावे, यासाठी पदाधिकारी, अधिकारी तसेच प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने या महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत या कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिले.