होमपेज › Jalna › स्थायी समितीच्या बैठकीत खडाजंगी

स्थायी समितीच्या बैठकीत खडाजंगी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी

दीड तास उशिराने सुरू झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या प्रारंभी विरोधी पक्षाचे सदस्य विविध मुद्यांवरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये विविध प्रश्‍नांवरून चांगलीच खडाजंगी झाली. आमचे म्हणणे प्रोसेडिंग बुकवर घेण्यात येत नसेल तर आम्ही 25 जण राजीनामे देऊ, असा इशाराही विरोधी सदस्यांनी सभागृहास दिला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी (दि. 26)  जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, जिजाबाई कळंबे, मीना घुगे, सीईओ निमा अरोरा, शालिकराम म्हस्के, अवधूत खडके, जयमंगल जाधव, बप्पासाहेब गोल्डे, आशा पांडे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
स्थायी समितीच्या बैठकीचा वेळ हा दुपारी दोन वाजेचा होता, मात्र उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्या उशिरा येण्यामुळे दीड तास उशिराने सुरू झाली. बैठकीच्या प्रारंभी शालिकराम म्हस्के हे विविध मुद्दावरून आक्रमक होऊन शेतकर्‍यांनी पाझर तलावासाठी दिलेल्या जमिनीचे दानपत्र दिलेले असूनही भूसंपादन विभागाकडून त्या जमिनी नावे करण्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याचे प्रश्‍न उपस्थित केला. या प्रकरणी दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्याला उत्तर देत सदरील जमिनी शासनाच्या नावे करण्याचा प्रस्ताव दानपत्रासह शासनाकडे पाठवावा, असे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी सांगितले.
स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेत सदस्यांचे म्हणणे प्रोसेडिंगमध्ये येत नसले तर काय उपयोग असा प्रश्‍न  शालिकराम म्हस्के यांनी उपस्थित करून मागील बैठकीप्रमाणे सोमवारच्या बैठकीत सदस्यांचे म्हणणे प्रोसेडिंग बुकमध्ये घ्यावेत, अशी मागणी केली. नुकत्याच जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीच बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांना वेळोवेळी सोयी सुविधा तसेच मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जाव्यात असे बप्पासाहेब गोल्डे यांनी सूचवले, तर स्पर्धेतून  राज्य पातळीवर सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे स्पोर्ट कीट तसेच साहित्य उपलब्ध करण्याचेही त्यांनी सूचना केली. 
सदस्य अवधूत खडके यांनी शिक्षणाधिकारी कवाने यांनी शहीद दिनानिमित्त पुण्यतिथी ऐवजी जयंती असे पत्रक काढल्याच्या प्रकाराचा निषेध केला. अशा निष्काळजीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी  नीमा अरोरा यांनी असे प्रकार पुन्हा झाल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले.

सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी बांधकाम समितीच्या निधीवरून उपस्थित केलेल्या प्रश्‍वानावरून अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. बांधकामाचा निधी आम्हाला देऊ नका असे त्यांनी सभागृहाला ठणकावून सांगितले. यावर टोपे यांनी कशाप्रकारे निधी टप्प्या-टप्प्याने मिळतो सांगितले. या प्रश्‍नावरून म्हस्के व टोपे यांच्या खडाजंगीनंतर म्हस्के सभागृहाबाहेर पडले.

 

Tags : Jalna, Jalna mews, Jalna ZP, Standing Committee, Meeting,


  •