Tue, Apr 23, 2019 21:44होमपेज › Jalna › मराठा समाजाचे आंदोलन तीन टप्प्यांत

मराठा समाजाचे आंदोलन तीन टप्प्यांत

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 23 2018 12:02AMजालना : प्रतिनिधी

आरक्षणाविषयी राज्यकर्त्यांचे वेळकाढू धोरण मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे संतप्त असलेल्या मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारपासून तीन टप्प्यांत आंदोलन केले जाईल, असा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.  

मराठा ठोक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (दि.22) मराठा सेवा संघ कार्यालयात  मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. मंगळवारी (दि.24) शहरात तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शिवाजी पुतळा येथून मोर्चास प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरड्यांचे दहन केले जाणार आहे.  यानंतर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (दि.25) जिल्हाभरातील शासकीय कार्यालये बंद ठेवले जाणार आहेत. तर गुरुवारी (दि.26) जिल्हाभर समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर हे आंदोलन होणार असल्याने एकाही रस्त्यांवरून वाहतूक होऊ दिली जाणार नसल्याचे निश्‍चित करण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात झाली. यावेळी तरुणांसह समाजबांधवांनी होत असलेल्या अन्याय, अत्याचार व आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील महामोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकास्तरीय मराठा वसतिगृह उभारण्याचे आश्‍वासन अद्याप पाळले नाही. दोन दिवसांपूर्वी नोकर भरतीत मराठा समाजास 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती होऊ देणार नसल्याचा इशारा समाजबांधवांनी दिला. 

रामनगर येथे आज रास्ता रोको आंदोलन 

रामनगर : मराठा क्रांती ठोक मोर्चा समर्थनार्थ जालना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि. 23) मंठा-जालना राज्य रस्त्यावर सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मंठा-जालना रस्ता रोकोनंतर मौजपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस चौकीवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी नियोजनही करण्यात आले. या बैठकीस सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.