Sun, Aug 18, 2019 15:31होमपेज › Jalna › आजपासून बेमुदत आंदोलनास सुरुवात

आजपासून बेमुदत आंदोलनास सुरुवात

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:58AMजालना : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संभाजी उद्यान परिसरात बुधवारी दुपारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला आंदोलनाचा जोर  नवव्या दिवशीही कायम आहे.जालना, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत बुधवारी ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले. वडोद तांगडा येथे तब्बल 70 तरुणांनी मुंडण करीत शासनाचा निषेध केला. औरंगाबादजवळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे जालना-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने संभाजी उद्यानाजवळ आंदोलनास मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले आहेत. आंदोलनास विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. ठिय्या आंदोलनास आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त करण्यात आला. शासनाविरोधातही रोष व्यक्‍त करण्यात आला.

जाफराबादेत : बेमुदत धरणे 

जाफराबाद : प्रतिनिधी 

तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बुधवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण हक्‍काचे नाही कोणाच्या बापाचे, मराठ्यांना आरक्षण, मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय’, अशा घोषणा देत  सरकारचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बगल देत सर्वसामान्य आंदोलनकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे चालू ठेवणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. राजकीय पुढार्‍यांनी राजकारण न करता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

वडोद तांगडा : 70 तरुणांचे मुंडण

पिंपळगाव रेणुकाई : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे आरक्षणाच्या  मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. यावेळी रस्त्यावर टायर जाळून चक्‍का जाम करण्यात आला. 70  तरुणांनी यावेळी मुंडण करीत शासनाचा निषेध केला.

मराठा समाजाच्या वतीने वडेादतांगडा येथे बुधवारी बंदची हाक देण्यात आली होती. गावातील व्यापार्‍यांनी दुकाने व हॉटेल्स कडकडीत बंद ठेवली होती. यावेळी 70 तरुणांनी सामूहिक  मुंडण केले.आंदोलकांनी धावडा रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको केला. यावेळी सर्वत्र धुरांचे लोट दिसत होते. आंदोलकांच्या शासनविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दुुमदुमून गेला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्‍त केला. यावेळी मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते.