Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Jalna › मराठा क्रांती मोर्चाचा केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

मराठा क्रांती मोर्चाचा केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 12:14AMवायनाड (केरळ) : ज्ञानेश्‍वर पाबळे

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने केरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. 14 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांतील लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. आर्थिक नुकसान झालेल्या केरळच्या मदतीसाठी व महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना शिवरायांच्या राष्ट्रप्रेम या शिकवणीप्रमाणे मदतीचा हात देण्यासाठी सांंगली वा जालना येथील मराठा क्रांती मोर्चाचे 10 जणांचे एक पथक 19 ऑगस्टपासून केरळला तर 30 जणांचे एक पथक गडचिरोली येथे मदत कार्य करत आहे.

हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतला. केरळ येथील पथकात सांगली येथील प्रशांत भोसले, डॉ. संजय पाटील, अनिल गायकवाड, जालना येथून प्रभू गाढे, ज्ञानेश्‍वर पाबळे, भगवान गिरणारे, गजानन गावंडे, सांगली येथून योगेश सूर्यवंशी, जेजुरी येथून अक्षय कोकाटे, संतोष मोरे, सहभागी झालेले आहेत. 
भारतीय लष्कराचे ऑपरेशन मदत जरी थांबवले असले, तरीही पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वायनाड व एर्नाकुलम जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरूच आहे. केरळमध्ये सर्वात जास्त विस्थापित एर्नाकुलम जिल्ह्यात आहे.

 पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपते घेण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे. त्याची सफाई करण्यावर व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या टिमने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये प्राथमिक स्वरूपात दैनंदिन जीवनात लागणारे मेडिसीन, साखर, तांदूळ, पीठ, साबण, कोलगेट, ब्रश, हळद, मिठ, मिरची पावडर, बिस्कीट, नवीन कपडे, चादरी, टाँवेल, टि-शर्टस, वाटप करण्यात आले.

या पथकात 1 डॉक्टर, वैद्यकीय सहायक आणि अन्य स्वयंसेवक आहेत. महापुराच्या जोरदार तडाख्यानंतर आता केरळमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठा क्रांती मोर्चाने वैद्यकीय पथक सोबत घेतलेले होते. या पथकाद्वारे वायनाड व एर्नाकुलम जिल्ह्यातील वाड्यावस्त्यावर व आदिवासी भागात पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणी करून त्यांना औषधी पुरवण्याचे काम मराठा क्रांती मोर्चाचे वैद्यकीय पथक करीत आहे.