Wed, Sep 19, 2018 16:22होमपेज › Jalna › तळणीत महावितरणचा मनमानी कारभार

तळणीत महावितरणचा मनमानी कारभार

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMतळणी : प्रतिनिधी

महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या वीजबिलांत गोंधळ केला जात आहे. अवाची सव्वा बिले देऊन ग्राहकांची लूट करण्यासोबतच मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.महावितरणचे नियमित वीजबिल भरणा करणारे ग्राहक कंपनीच्या  कारभाराला वैतागले आहेत. दर महिन्याला दोनशे ते पाचशे रुपयांच्या आत बाहेर येणारे बिल अचानक हजारो रुपये येत आहे. बिल भरावे की नाही, हा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. तळणी गावामध्ये एकूण तीनशेपेक्षा अधिक अधिकृत  मीटरधारक आहेत. बर्‍याच ग्राहकांना याचा फटका आहे. नियमित वीज बिल भरणारे ग्राहक बिल भरण्यास टाळाटाळ करीत आहे. या जास्तीच्या वीज बिलाबाबत काही महिलांना मंठा येथील कार्यालयात तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. ग्राहकांचे वीजबिल नऊ हजारांवरून सात हजार रुपये करून देण्यात आले.

संबंधित ग्राहकाने बिल भरणा केल्यानंतर स्थानिक लाईनमनने नवीन मीटर बसवून दिले. यानंतर संबंधित ग्राहकाला पाच हजारांपेक्षा जास्त बिल आल्याने बिल कसे भरावे हा प्रश्‍न पडला आहे. संबंधित मीटरच्या रीडिंगची नोंद झालेली नाही. असे असूनही बिल वितरित करण्यात येत आहे.  बिल भरणार्‍या ग्राहकांवर याचा परिणाम होत आहे. थकबाकीदार ग्राहकांची संख्या वाढण्याचे हे एक कारण असू शकते.

एकूणच महावितरणकडून ग्रामीण भागात अनागोंदी कारभार सुरू आहे. याचा त्रास सर्वसामान्य  वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. जास्तीचे बिल आल्यावर महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांवर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्रस्त करतात. वीज साधने जास्त असेल, वापर जास्त असेल म्हणून महावितरणने दिलेले बिल बरोबर असल्याचे सांगतात. याचा त्रास ग्राहकांना होत आहे. काही वेळा महावितरणकडून वीजबिल दुरुस्ती केली जाते. मात्र त्यासाठी मंठा येथील कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात. एकूणच महावितरणच्या अजब कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे.