होमपेज › Jalna › प्रेमाच्या त्रिकोणातून एकावर प्राणघातक हल्‍ला, शस्त्रे जप्त 

प्रेमाच्या त्रिकोणातून एकावर प्राणघातक हल्‍ला, शस्त्रे जप्त 

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 2:09AMजालना : प्रतिनिधी

प्रेमाच्या त्रिकोणातून विशाल कॉर्नर येथे एका  तरुणावर प्राणघातक हल्‍ला झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर अवघ्या दोन तासांत चंदनझिरा पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्रही जप्‍त केली.

बदनापूर तालुक्यातील पाडळी येथील कृष्णा सिरसाट याचे एका महिलेशी  प्रेमप्रकरण होते. त्यानंतर या महिलेचे शोएब चाऊस (21) याच्याशी प्रेमसंबध जुळले. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. गुरुवारी बाळासाहेब सिरसाट व कृष्णा काकासाहेब सिरसाट हे दोघे रात्री सिटीजन्स हॉटेलजवळ रिक्षा (क्र. एम.एच.20 ए.एफ.3009) घेऊन प्रवाशांची वाट पाहात होते. तेथे दोघांनी येऊन बाळासाहेब सिरसाट याच्या तोंडावर फायटरने मारहाण करीत  त्याच्या खिशातील मोबाइल बळजबरीने हिसकावून  नेला. यावेळी आरोपींनी कृष्णा सिरसाट याच्यावर प्राणघातक हल्‍ला करून निळ्या रंगाच्या मोटरसायकलवरुन पळ काढला. दरम्यान चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  किशोर बोर्डे, पोलिस उपनिरीक्षक गिरासे, संजय कटके, अनिल काळे यांनी धाव घेउन पाहणी केली. त्यानंतर  अवघ्या दोन तासांत आरोपी शोएब चाऊस व त्याचा मित्र अरबाज शेख यांना पोलिसांनी हल्‍ला केलेल्या धारदार हत्यारासह जेरबंद केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.