होमपेज › Jalna › बिबट्याची दहशत कायम

बिबट्याची दहशत कायम

Published On: May 28 2018 1:43AM | Last Updated: May 27 2018 11:10PMवडीगोद्री : प्रतिनिधी

परिसरात तब्बल बारा दिवसांपासून बिबट्याचा थरार कायम आहे. वन विभागाकडून शोधमोहीम सुरू असून पिंजरा लावूनही बिबट्या सापडत नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

वडीगोद्री, धाकलगाव, पिठोरी सिरसगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. बारा दिवसांत एक कुत्रा, दोन वासरे, एक गोर्‍ह्याचा फडशा पडला आहे. यामुळे पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला असून दोन प्राणी जखमी झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात जात आहेत.

मात्र अद्यापपर्यंत बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा बसवला आहे. मात्र परिसर मोठा असल्याने बिबट्या सापडणे कठीण झाले आहे. प्रत्यक्षदर्शी बघितलेल्या शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, तो बिबट्याच आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी म्हणतात की, वनपाल यांनी  प्रत्यक्षात बघितल्याशिवाय काही सांगू शकत नाही. फक्त हिंस्र प्राणी आहे एवढेच सांगू शकतो. या बिबट्याच्या होत असलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकर्‍यांनी केली आहे.

ठराविक ठिकाणी पिंजरा लावण्यात आला असून वनपाल व वन रक्षक यांना सूचनाही दिल्या आहेत. बिबट्या आहे की अन्य प्राणी हे पायाच्या ठशांवरून लगेच सांगू शकत नाही. तो प्राणी एका ठिकाणी थांबत नसल्याने तो लवकर सापडत नाही. मृत्यू झालेल्या प्राण्यांचा पंचनामा करण्यात आला. नुकसानभरपाई साठी  ऑनलाईन अर्ज भरावे जेणे करून शेतकर्‍यास  नुकसानभरपाई मिळेल.   -पी. एम. केदार, वन क्षेत्रपाल, जालना