Thu, Jun 20, 2019 06:58होमपेज › Jalna › धोकादायक शाळेत शिक्षणाचे धडे

धोकादायक शाळेत शिक्षणाचे धडे

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:32AMतळेगाव : कल्याण धायडे

तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. याच इमारतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.शिक्षण विभागाचेही या निजामकालीन इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे.

पाच  वर्षांपूर्वी वर्गखोल्यांचे पत्रे उडाले होती. मात्र अद्यापही पत्रे न बसविल्याने या खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजीटल होत असताना या शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याने पालकात तीव्र संताप आहे. तळेगाव येथे पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 228 विद्यार्थी शिक्षण घेतात. एकूण आठ खोल्या आहेत. त्यापैकी पाच खोल्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम 1965 च्या दरम्यान आहे. खोल्यांचे काम निजामकालीन आहे. जीर्ण झालेल्या खोल्या तत्काळ दुरस्त करण्यात यावी अन्यथा खोल्या पडल्यास अनुचित प्रकार घडु शकतो. यामुळे गावातील पालकांनी या खोल्या पाडण्याची परवानगी जिल्हा परिषद  व पंचायत समितीकडे केली आहे. मात्र याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. भिंतना तडे गेलेले आहेत. प्लास्टर निघालेले आहे.   खिडक्या दरवाजे जीर्ण होऊन तुटलेले आहेत.

असून अडचण नसून खोळंबा

शाळेच्या इमारतीचे बांधकाम निजामकालीन असल्याने इमारत मोडकळीस आलेली आहे . त्यामुळे मुलांना शाळेतील वर्‍हांड्यावर ज्ञानार्जनासाठी बसावे लागत आहे. त्यामुळे शाळेची असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.शासन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करते, परंतु तळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे पाहता शिक्षण विभागाने या शाळेकडे पाठ फिरवली आहे, असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण होत आहे.

तत्कालीन अध्यक्षांचे आश्‍वासन हवेतच

शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलननिमित्त  तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष  तुकाराम पा जाधव यांनी धावती भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेला नवीन इमारत बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु तीन वर्षे झाले पण  पूर्तता झाली नाही.-जगन गव्हाड, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन