होमपेज › Jalna › पहिल्या रेशीम खरेदी केंद्राचा शुभारंभ 

पहिल्या रेशीम खरेदी केंद्राचा शुभारंभ 

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:58PMजालना : प्रतिनिधी

कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. येणार्‍या काळात मराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला अधिक गतीने चालना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.येथील  बाजार समितीच्या इमारतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेचे उद्घाटन राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोषांची खरेदी करून शनिवार, 21  रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजेश टोपे, जि.प.चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणी, भास्कर आंबेकर, पांडुरंग डोंगरे, भानुदास घुगे, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय कदम, उपसंचालक मुंशी, सहसंचालक दिलीप हाके, कृउबाचे सचिव गणेश चौगुले, रेशीम विकास अधिकारी व्ही.एम. भांगे, मनोज मरकड आदींची उपस्थिती होती. 

राज्यमंत्री  खोतकर म्हणाले की, रेशीम विकासाला चालना मिळावी. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने रेशीम कोष खरेदी केंद्र जालन्यात व्हावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला.  या पाठपुराव्यामुळे शासनाने या खरेदी केंद्राला मान्यता दिली.  शहरामध्ये 2.5 एकर जागा उपलब्ध करून देत यासाठी 6 कोटी 19 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारा रेशीम उद्योग असून एका एकरामध्ये दरवर्षी किमान 5 लक्ष रुपयांचे उत्पादन घेता येते. महारेशीम अभियानामुळे जवळपास 18 ते 20 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. रेशीम उद्योगाचा वस्त्रोद्योग धोरणामध्येही समावेश करण्यात आला असून याचा फायदाही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. रेशीम आळी (चोकी) उत्पादन व्यापार्‍यांमार्फत होत आहे.  चोकी उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनामार्फत शेतकर्‍यांना सहाय्य करण्यात येईल. 

Tags : Jalna, Launch, First, Silk, Purchase, Center