Tue, May 26, 2020 22:28होमपेज › Jalna › गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून मित्रांनीच केला खून 

खंडेलवाल खून प्रकरण; ३६ तासांत लावला छडा 

Published On: Sep 02 2019 2:10PM | Last Updated: Sep 02 2019 2:10PM
परतूर (जालना) : प्रतिनिधी

परतूर येथील कुंदन घनशाम खंडेलवाल (वय-२१) या तरुणाचा भरदिवसा शनिवारी (दि.३१) रोजी अज्ञातानी खून केला होता. भरदिवसा झालेल्या या खुनामुळे परतूर शहरात एकच खळबळ उडाली होती. या खुनाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सलग दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. या खून प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या खूनाचा छडा अवघ्या ३६ तासातच लावत तीघां जणांना अटक केली.

पृथ्वीराज देविदास अंभोरे (वय१९), रोहित शर्मा उर्फ राहुल रामजीवन खंडेलवाल (वय १९), अनिल विठ्ठलराव सोनवणे (वय २६) या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी कुंदनला घरी येऊन हे तिघे मित्र दोन मोटारसायकलवरून सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर घेऊन गेले होते. त्याठिकाणी कुंदन याच्या डोक्यात, कानाजवळ पिस्तुलातून गोळ्या झाडून हे तिघे घटनास्थळाहून पसार झाले होते. या घटनेची नोंद परतूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या खूनाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. 

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली होती. पोनि. गौर यांनी बारकाईने केलेल्या चौकशीत कुंदनचा खून पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातूनच त्याच्या मित्रांनीच केल्याचे समोर आले. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने अवघ्या ३६ तासात खून उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.