Wed, Jul 17, 2019 18:25होमपेज › Jalna › जामवाडीत फळबाग, पिकांचे 4 लाखांचे नुकसान

जामवाडीत फळबाग, पिकांचे 4 लाखांचे नुकसान

Published On: Feb 12 2018 1:50AM | Last Updated: Feb 12 2018 12:18AMजालना : प्रतिनिधी

तालुक्यातील जामवाडी व परिसरात रविवारी झालेल्या वादळीवार्‍यासह गारपिटीच्या पावसाने फळबाग व पिकांचे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले आहे. या भागात तीन ते चार मिनिटे झालेल्या गारांच्या पावसाने परिसरात गारांचा थर साचला होता.

काही वर्षांपासून येथील शेतकर्‍यांनी द्राक्षबागेची लागवड मोठ्या प्रमाणात केली. यातील काही बागांची काढणी दोन दिवसांवर आली होती. शेतकर्‍याकडे एक ते दोन एकरपर्यंत द्राक्षबाग आहे. एका बागेत 150 ते 250 क्‍विंटल द्राक्ष होते. यामुळे द्राक्षबागेच्या शेतकर्‍यांचे जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीच्या पावसाने द्राक्षबागेतील घड गळून पडले. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंबाचा आंबेबहारही पूर्णपणे झोडपला गेला.  मोसंबी बागेचा फुलोरा गळून पडला आहे. यामुळे फळबागांचे जवळपास 70 ते 80 टक्के नुकसान झाले आहे. याशिवाय काढणीस आलेल्या ज्वारी, हरभरा, गहू यांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांचे शेडनेटचेही नुकसान झाले आहे.  येथील मधुकर रावसाहेब वाढेकर, डिंगाबर अण्णासाहेब वाढेकर, अजय वाढेकर, शरद जालिंदर वाढेकर, राहुल वाढेकर, रंगनाथ पाटीलबा धिरडे, विलास वाढेकर, काकासाहेब वाढेकर यांच्यासह अन्य शेतकर्‍यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले.