Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Jalna › पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा

पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा

Published On: Mar 01 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 11:36PMऔरंगाबाद/जालना :  प्रतिनिधी

पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर बनावट नोटांना पायबंद बसेल, हा केंद्र सरकारचा दावा भामट्यांनी फोल ठरवला. पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची हुबेहूब छपाई करून त्या चलनात आणणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन जणांना जालन्यातून, तर तीन जणांना औरंगाबादेतून अटक करण्यात आली. जालन्यात पकडलेला आरोपी पोलिसांचा पंटर निघाला. आरोपींच्या ताब्यातून 300 बनावट नोटा (दीड लाख रुपये) तसेच, 45 हजार रुपयांची रोकड आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्या विशेष पथकाने कॅनॉट परिसरात ही कारवाई केली. 

अफसर पठाण (38, रा. नारेगाव), भिका उत्तमराव वाघमारे (39, ह.मु. चिकलठाणा, रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) आणि सुनील बोराडे (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे  आहेत. 
पोलिसांनी वसंतराव नाईक कॉलेजच्या गेटजवळ अफसर पठाण आणि भीमा वाघमारे या दोघांना सापळा रचून पकडले. पठाणकडून पाचशे रुपयांच्या 66 बनावट नोटा तसेच, 10 हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आढळल्या. वाघमारेकडे 100 बनावट नोटा आणि 510 रुपये रोकड सापडली. त्यांनी सुनील बोराडेकडून नोटा घेतल्याची कबुली दिल्यावर बोराडेलाही अटक केली. या तिघांकडून पाचशे रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.