होमपेज › Jalna › जालना जिल्हा परिषदेचे बायोमेट्रिक बंद

जालना जिल्हा परिषदेचे बायोमेट्रिक बंद

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 09 2018 11:44PMजालना : प्रतिनिधी

लेटलतीफ व दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांवर वचक राहावा. तसेच त्यांनी कार्यालयात वेळेवर येण्याचे बंधन पाळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयात जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च करून 2013 मध्ये बायोमेट्रिक बसविण्यात आले. मात्र बायोमेट्रिक बसविण्यात आल्यापासून ते बंदच असल्याने मिनी मंत्रालयात करण्यात आलेला साडेचार कोटींच्या खर्चाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे नुकतीच निमा अरोरा यांनी स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी 32 लेटलतीफ कर्मचार्‍यांवर कारवाई करीत जिल्हा परिषदेला शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.  बायोमेट्रिक बंद असल्याने सकाळी साडेदहा वाजताच त्या हजेरी पुस्तक ताब्यात घेत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. पूर्वी उशिरा येऊन चहाच्या टपरीवर वेळ घालवणार्‍या कर्मचार्‍यांसाठी निमा अरोरा यांची शिस्त जाचक ठरत आहे. पदभार स्वीकारल्याच्या दुसर्‍या दिवशी अरोरा यांनी कर्मचार्‍यांच्या केलेल्या तपासणीत सामान्य प्रशासन विभागातील 11, महिला व बाल कल्याण विभागातील 1, बांधकाम 4, शिक्षण 5, आरोग्य 2, पाणीपुरवठा यांत्रिक विभागातील 1 तर सिंचन विभागातील 3 कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या लेट लतीफ कर्मचार्‍यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मिनी मंत्रालयातील कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासह ढासळलेला कारभार सुधारण्याची अवघड कामगिरी अरोरा यांच्यासमोर आहे. मार्च जवळ आल्याने अखर्चिक निधी परत जाणार नाही याबाबतही अरोरा यांना लक्ष द्यावे लागणार आहे. विकास निधीच्या प्रश्‍नावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्य नाराज असून हा प्रश्‍नही त्यांना सोडवावा लागणार आहे. 

जिल्हा परिषदेत लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही बंद असून ते  सुरू होणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही सुरू झाल्यास अरोरा यांना सोयीचे होणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयासह जिल्ह ्यातील शाळांसाठी खरेदी करण्यात आलेले बायोमेट्रिक बसविल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत बंद पडले की, अडचण होत असल्याने ते बंद पाडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.  मिनी मंत्रालयात काही विभाग असे आहेत की ज्या विभागातील कर्मचार्‍यांना दिवसभर काहीच काम नसते. या कर्मचार्‍यांचा सीईओंना वापर करून घ्यावा लागणार आहे.