होमपेज › Jalna › जिल्ह्यात शिवजयंतीचा जल्लोष

जिल्ह्यात शिवजयंतीचा जल्लोष

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMजालना : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती सोमवारी (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका, दुचाकी रॅली तसेच विविध कार्यक्रमांनी शहर फुलून गेले होते. सकाळी शिवाजी पुतळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुष्पवृष्टी व दुग्धाभिषेक करण्यात आला. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवसंस्कृती प्रतिष्ठान व राहुलभैय्या लोणीकर मित्रमंडळ शिवतेज प्रतिष्ठान, सिंहगर्जना ढोलताशे मंडळ, सिद्धिविनायक वारकरी प्रबोधन मंडळ, बाजी उम्रद गावकरी मंडळ, एम. राज मित्र मंडळ, शंकर मोहिते मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सव समितीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी 10 वाजेपासूनच उद्यान परिसरात भगवे फेटे परिधान केलेले व मोटारसायकलला शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे लावून शिवभक्‍त जमा होऊ लागले होते. पालखी मिरवणुकीचा रथ वेगवेगळ्या फुलांनी सजविला होता. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रथामध्ये शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धशर्करेद्वारा पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चरात अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर भगवा झेंडा दाखवून पालकमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅलीत तलवार बाजी पथक, घोडेस्वारी पथक, टाळ मृदंग पथक, जुन्या काळातील संबळ, पालखी, लेझीम पथक, अश्‍वरथ, बेटी बचाओ बेटी पढाओ संच, स्वछता अभियान पथक आदी देखावे सादर करण्यात आले. 
सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दुपारी गांधी चमन येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, हिकमत उढाण, भास्कर दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल,  भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, भास्कर अंबेकर, रवी राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.