Sun, Oct 20, 2019 11:44होमपेज › Jalna › परवाने दोन महिन्यांपासून बंद

परवाने दोन महिन्यांपासून बंद

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:40AMजालना  : अप्पासाहेब खर्डेकर

प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने डिजिटल तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे, मात्र जिल्ह्यात दुकाने परवाना व नूतनीकरणाची ऑनलाइन प्रक्रिया मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे, तर ऑफलाइन परवाने देणेही बंद झाले आहे. यामुळे  व्यावसायिक, मुद्रा योजनेचे लाभार्थी यांचे गुमास्ता परवाना, नूतनीकरणाचे काम बंद पडले आहे. शहरातील व्यापारी, दुकानदार, कंत्राटदार, नवीन व्यवसाय सुरू करणार्‍या व्यावसायिकांना गुमास्ता व शॉप अ‍ॅक्ट परवाना काढणे  गरजेचे असते.

परवान्याशिवाय कर्जप्रकरणे व इतर कायदेशीर व्यवहारही करता येत नाही. दोन वर्षांपूर्वी परवान्यासाठी हस्तलिखित अर्ज करावे लागत होते. दोन वर्षांपासून शासनाने ही प्रक्रिया ऑनलाइन केली. मात्र 21 डिसेंबरपासून ऑनलाइन सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे दुकानदारांची कर्जप्रक्रियेसारखी महत्त्वाची प्रकरणे थंड बस्त्यात पडली आहे. राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना विभागातील अधिनियमात बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शहरात याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रम असून यंत्रणेविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.