Thu, Jun 27, 2019 04:26होमपेज › Jalna › बाहेरील लोकांचा मराठवाडा विकासाला विरोध

बाहेरील लोकांचा मराठवाडा विकासाला विरोध

Published On: Feb 19 2018 1:51AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMजालना  :प्रतिनिधी 

मराठवाडा गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिला होता. मात्र केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मराठवाड्यात रस्त्यांसह विविध विकासकामे सुरू झाली आहेत. या विकासकामांना पश्‍चिम महाराष्ट्रातून आलेले काही नेते शेतकर्‍यांना पुढे करून विरोध करीत आहेत. अशा लोकांना मराठवाडा विकास परिषदेच्या लोकांनी एकत्र येऊन विरोध करावा, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 

येथील टाऊन हॉल भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मराठवाडा विकास परिषदेच्या जिल्हा अधिवेशनात लोणीकर बोलत होते. यावेळी मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, डॉ. संजय लाखे पाटील, विजयअण्णा बोराडे, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, आर. आर. खडके, अ‍ॅड. विनायक चिटणीस, रामेश्‍वर भांदरगे, उद्योजक घनश्याम गोयल, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

लोणीकर म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते रस्त्यासह विविध विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येतात. त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यांसाठी शेतकर्‍यांची जमीन चालते मात्र मराठवाड्यात शेगाव-पंढरपूर रस्त्याच्या कामात शेतकर्‍यांना पुढे करून हेच नेते राजकारण करतात, अशी अप्रत्यक्ष टीका लोणीकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. दिंडी मार्गात जमीन गेलेल्या शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिली.

यावेळी मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, डॉ. संजय लाखे पाटील, अ‍ॅड. विनायक चिटणीस, विजय अण्णा बोराडे आदींनी मराठवाड्यातील सिंचन, रस्ते, उद्योग, रेल्वेसह विविध विकासांच्या असलेल्या अनुशेषाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.