Fri, Jul 19, 2019 14:08होमपेज › Jalna › जालना-अंबडमधील पाणीप्रश्‍न पेटणार

जालना-अंबडमधील पाणीप्रश्‍न पेटणार

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:38PMजालना : प्रतिनिधी

जालना शहरास पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी व जायकवाडी जलाशयात या वर्षी चांगला पाणीसाठा असतांनाही जालनेकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. जुना जालना भागात दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असतानाच जायकवाडीच्या पाण्यावर अंबडकरांनी 10 टक्के पाणी मिळण्याचा दावा केला आहे.  त्यासाठी आमदार नारायण कुचे यांनी आपले राजकीय वजन वापरून थेट मुख्यमंत्र्यानाच साकडे घातल्याने आगामी काळात अंबड व जालन्यातील पाणी -वॉर पेटण्याची शक्यता आहे. 4  मे रोजी होणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सवार्र्ंचे लक्ष लागून आहे. 

शहराचा पाणीप्रश्‍न अत्यंत जुना व गुंतागुतीचा आहे. शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी  सुरुवातीस गल्हाटी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधानंतर ही योजना करोडो रुपये खर्च केल्यानंतर बारगळली. त्या नंतर शहागड -जालना पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेचे पाइप निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याने या योजनेतून अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा सुुरु झाला. त्यातच अंबड शहरालाही त्यातून पाणी देण्यात आले. योजनेची  निकृष्ट पाईपलाइन व इतर कारणामुळे ही योजना जालनेकरांची तहान भागविण्यात अपयशी ठरली.

त्यांनतर 2012 च्या दुष्काळात जालन्याचा पाणीप्रश्‍न राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजला. त्यावेळी एप्रिल व मे महिन्यात तब्बल एक महिन्यात एकदाच पाणी पुरवठा करण्यात आल्याने अनेकांनी औरंगाबादसह इतर ठिकाणी स्थलांतर केले. त्यांनतर शहरातील काही सुजाण नागरिकांनी जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशाने  जायकवाडी -जालना पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्यातून अंबडला पाणी देण्यासाठी मोठा वाद झाला. त्यांनतर या योजनेतून 2.5 एमएलडी पाणी पैसे घेऊन देण्याचा तोडगा काढण्यात आला. राज्यात झालेल्या सत्तांतराचा फायदा घेत भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे या योजनेतून 10 टक्के पाणी अंबडला देण्याची मागणी केली. त्यास काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी विरोध केला.