होमपेज › Jalna › खरिपाच्या १५ पिकांना विम्याचे संरक्षण कवच

खरिपाच्या १५ पिकांना विम्याचे संरक्षण कवच

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:51PMजालना : प्रतिनिधी

यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित 15 पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकर्‍यांसाठी 31 जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी 24 जुलै ही अंतिम मुदत आहे. 

नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे, शेतकर्‍यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या कठीण काळात  शेतकर्‍यांचे  आर्थिक  स्थैर्य  अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकर्‍यांना बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराशिवाय कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना दोन टक्के, तर रब्बी हंगामासाठी व नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा भरावयाचा आहे. या योजनेंतर्गत पाच टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे.

जिल्हा समिती घेणार आढावा

प्रत्येक हंगामाच्या वेळी कृषी विभागाद्वारे कृषिविषयक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण व संनियंत्रण करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या  अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. यात जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जि. प. कृषी विकास अधिकारी सदस्य व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समितीचे सचिव राहणार आहेत.

अधिसूचित क्षेत्र घटक ग्राह्य

पिकाच्या नुकसानभरपाईसाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकर्‍यांनी विमा हप्ता भरणा केला व ज्या शेतकर्‍यांच्या खात्यातून हप्ता कपात करण्यात आला, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहे. अपेक्षित भरपाईच्या 25 टक्क्यांर्यंत रक्कम आगाऊ देण्यात येईल. 

यावर्षी पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइनची सुविधा राहणार आहे.  खरीप हंगामातील प्रमुख पिकासह अन्य पिकांचा विमा उतरविण्यात येणार आहे.  -दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी अधीक्षक