Mon, Apr 22, 2019 21:58होमपेज › Jalna › शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 1:30AMजालना : प्रतिनिधी

शालेय पोषण आहार तपासणीसाठी तीन सदस्याचे राज्यस्तरीय पथक शुक्रवारी (दि.6) जिल्ह्यात दाखल होत आहे. दोन दिवशीय दौर्‍यात आहाराचा मेनू, आहाराचा दर्जा, स्वच्छता, दैनंदिन रजिस्टर आदीं बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

सर्व माध्यमांच्या शाळेतील शालेय पोषण आहार पुरविण्याच्या प्रणालीचा आढावा घेण्यासाठी 6 ते  7 एप्रिल रोजी येणारे राज्यस्तरीय पथक जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहे. पथक शैक्षणिक मूल्यमापन, परिसर स्वच्छता, शालेय पोषण आहाराचा रेकॉर्ड,  खिचडीची गुणवत्ता, शासनामार्फत दिलेल्या साहित्याचा योग्य वापर होतो का, उपस्थितीनुसार मागणी आणि वाटप आहे का, अनुदान चेकद्वारे दिले जाते का पोषण आहाराची गुणवत्ता आदीं बाबी तपासणार  आहे.  

शालेय पोषण आहाराबाबत अनेकदा तक्रारी समोर येतात. या योजनेतील त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी शासनाने ‘स्टेट रिव्ह्यू मिशन’ची (एसआरएम) नेमणूक केली आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यांत ठराविक शाळांची तपासणी केली जाणार आहे. पुणे विभागाचे उपसंचालक शरद गोसावी, पुुणेचे लेखाधिकारी अंकुश शहागंटवार आणि बीडचे अजय बहिर यांचा समितीत समावेश राहणार आहे. 

साहित्याचीही करणार पाहणी 

जिल्हातील विविध शाळांमधून राबविली जाणारी शालेय पोषण आहार योजनेची स्थिती काय आहे, मागणी आणि वाटप योग्य आहे का, शासनाकडून दिलेल्या साहित्याचा योग्य वापर होतो का, याची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहे.  शाळांची संख्या 5 हजारांच्या घरात असताना बोटावर मोजण्या एवढ्याच शाळांचा तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या समिती विषयी वेगळी चर्चा रंगत आहे. 

तपासणीची औपचारिकता 

पथक जालना जिल्ह्यावर येणार याचे वेळापत्रक पूर्वीच जाहीर करण्यात आले. तपासणीसाठी जिल्ह्यात समिती येणार हे माहिती असल्याने शाळांनी तयारी केलेली अनेक शाळांमधील खिचडीची चव, दर्जा गेल्या चार, पाच दिवसांत बदलला. बोटावर मोजण्या एवढ्याच शाळांची तपासणी आणि पूर्वीचे वेळापत्रक माहिती असल्याने हा प्रकार एक औपचारिकता असल्याची  चर्चा आहे.

 

Tags : Jalna, Jalna news, school, school nutrition, Inspection,