Wed, Nov 14, 2018 16:45होमपेज › Jalna › कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:01AMपरतूर : प्रतिनिधी

तालुक्यात अनेक गावांमध्ये कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. दरम्यान तालुका कृषी विभागाच्या वतीने एदलापूर येथे तालुका कृषी अधिकारी महादेव काटे यांनी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन मर रोगाबाबत माहिती दिली.

कापूस पीक सध्या फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. पावसाच्या मोठ्या खंडानंतर गेल्या दोन ते तीन  दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे कापसामध्ये मर रोगाची लागण झालेली दिसून येत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार वाघमारे यांनी सांगितले.पिकांना सतत 15 दिवसांचा पाण्याचा ताण पडला व त्यानंतर पाणी देण्यात आले तर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. सतत सूर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळेही मर रोग दिसतो. जास्त पाणी झाले तरीही मर होतो. अशा परिस्थितीत कापूस पीक मुळावाटे अन्‍न घेऊ शकत नाही.

अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक सुकून जाते. यासाठी शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. प्रथमत: शेतामधून पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून टाकावे. त्यानंतर 15 ग्रॅम युरिया + 15 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + 2 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड प्रतिलिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण 100 ते 150 मि. ली उमललेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पिकाला लगेचच अन्नद्रव्य् उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.