Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Jalna › भेसळीच्या पदार्थांमध्ये वाढ

भेसळीच्या पदार्थांमध्ये वाढ

Published On: May 29 2018 1:40AM | Last Updated: May 28 2018 11:33PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यातील मिठाई तसेच  खाद्य पदार्थांच्या दुकानांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. अनेक दुकानदार भेसळीचे पदार्थ ग्राहकांच्या माथी मारून स्वत:ची तुंबडी भरत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

भोकरदन शहरासह तालुक्यातील राजूर, आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, पारध, दानापूर, वालसावंगी, हसनाबाद, धावडा या गावात प्रमुख बाजारपेठा असून या बाजारपेठेत दररोज हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. 

भोकरदन शहरसह तालुक्याच्या आर्थिक वाहिन्या समजल्या जातात. या बाजारपेठांमध्ये कापड दुकाने, सराफ दुकाने याबरोबरच स्वीट मार्टची दुकाने, बेकरी व मेवा-मिठाईची दुकाने अशा दुकानांची रेलचेल असते. मात्र या दुकानांमध्ये भेसळीचे पदार्थ शुध्द असल्याचे सांगत अव्वाच्या सव्वा किंमत आकारून ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. मिठाई, तेल, दूध, मलाई आदी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे बोलले जात आहे.

भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने यापूर्वी कारवाई केली जात होती. त्यामुळे भेसळ करणार्‍यांना त्यांच्यावर होणार्‍या कारवाईची भीती होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून भोकरदन तालुक्यात अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा गैरफायदा अनेक दुकानदारांनी घेतला आहे. कमी खर्चात झटपट पैसे मिळण्यासाठी व्यापारी, दुकानदार वर्ग मोठ्या प्रमाणात भेसळीचे पदार्थ विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. पेढे, बर्फी, खवा तसेच तेल यामध्ये तर अनेकजण सर्रास भेसळ करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अधिकार्‍यांना तक्रार प्राप्‍त झाल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. नियमित तपासणी सुरू असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांनी सांगितले.

कारवाईला विश्रांती

अन्न औषध प्रशासनाचे काही अधिकारी भेसळ होत असल्याच्या संशयावरून एखाद्या दुकानावर छापा टाकतात. मात्र, एक छापा टाकला तरी त्याच्या तपासणीचे नमुने लवकर प्राप्त होत नाहीत, त्या कारवाईचे पुढे काय होते, हे नागरिकांना समजत नाही. मात्र, अशी कारवाई झाली की दुकानदार एकत्र येऊन साहेबांचे हात ओले करतात, त्यानंतर कारवाईला विश्रांती मिळते,  फार्स नको तर प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

तेल, दूध तपासणी गरजेची

भोकरदन तालुक्यात काही छोट्या व्यापारी वर्गाबरोबर तेल आणि दूध विक्रीत काही बडे व्यापारी गुंतले आहेत. या साखळीत अगदी हुबेहूब दिसणारे तेल आणि दूध बनविण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रामुख्याने तेल आणि दूधाचे तालुक्यातील विविध ठिकाणचे नमुने तपासण्याची  गरज आहे.