Sat, Aug 24, 2019 22:20होमपेज › Jalna › आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलांचे महत्त्व कमी

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलांचे महत्त्व कमी

Published On: May 29 2018 1:40AM | Last Updated: May 28 2018 11:31PMआन्वा : प्रतिनिधी 

पिढ्यान्पिढ्या बळीराजाच्या कष्टाला साथ देणारा बैलजोड्या कमी होत आहेत. गतीने काम होण्यासाठी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करीत आहेत.

शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी आदी शेती मशागतीच्या कामात ट्रॅक्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अनेक वर्षांपासून शेतामध्ये सतत कष्ट करणार्‍या बैलांचे महत्त्व कमी होत चालले आहे.

आपला देश हा कृषीप्रधान असल्याने अनेक वर्षांपासून शेतकरी हा बैलांच्या आधारावर शेती करत आहे. शेतातील पेरणी, कोळपणी, नांगरणी, वखरणी अशा सततच्या कामासाठी बैलांचा वापर करीत होता. शेतातील माल वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. यंत्रापेक्षा बैलाची शेती मशागत वेगळीच असते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दृष्टीने बैलाला महत्त्वाचे मानले जाते. वर्षातून एकदा बैल पोळ्याच्या दोन दिवसांच्या सणाला शेतकरी बैलाची विशेष पूजा करत असतो.

आधुनिक यांत्रिक युगामध्ये शेतकर्‍यांच्या हातात बैलाच्या कासरा ऐवजी ट्रॅक्टरची स्टेअरिंग पाहायला मिळत आहे. शेतीकामासाठी जवळपास सर्वच कामासाठी ट्रॅक्टरचा वापर होत असल्यामुळे बैलांचे काम कमी झाले आहे.

कमी वेळेत जास्त काम होत असल्यामुळे शेतामधील बरीच बैलाची कामे कमी झाली आहे. यंत्रयुग असल्याने शेतकर्‍यांच्या सोयीसाठी विविध आधुनिक यंत्राचा वापर करणे साहजिकच आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही शेतकर्‍यांच्या सोयीसाठीच मानली जात असली तरी यंत्रापेक्षाही बैलांची शेती मशागत उत्तमच मानली जाते. काही शेतकरी बैलजोडीच्या मदतीने शेती नांगरणी करीत असल्याचे तुरळकच चित्र दिसते.