Thu, Aug 22, 2019 10:13



होमपेज › Jalna › नालासोपारा स्फोटक प्रकरणी जालन्यातून गणेश कपाळे ताब्यात

नालासोपारा स्फोटक प्रकरणी जालन्यातून गणेश कपाळे ताब्यात

Published On: Sep 12 2018 3:58PM | Last Updated: Sep 12 2018 3:58PM



जालना : प्रतिनिधी 

नालासोपारा स्फोटक प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, बुधवार (दि. १२ सष्टेंबर) सकाळच्या सुमारास जालना शहरातून गणेश कपाळे याला ताब्यात घेतले. कपाळे हा श्रीकांत पांगारकरचा मित्र असून कपाळेच्या संगणकातून ईमेल्स अथवा काही मजकूर असल्याने याप्रकरणी त्याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. 

जुना जालना भागातील शनि मंदिर चौकात गणेश कपाळे याचे झेरॉक्स व डीटीपी सेंटर आहे. या दुकानात श्रीकांत पांगारकरची उठबस होती. या कारवाईत दुकानातील संगणक, हार्डडिस्क साहित्य एटीएसने जप्‍त केले आहे.

परिसरात एकच खळबळ

गणेश कपाळे शनि मंदिर चौकासह परिसरात सर्वपरिचित आहे. त्याला ताब्यात घेतल्याचा अनेकांना विश्‍वास बसत नसल्याचे चित्र होते. या प्रकरणी परिसरातील अनेकांना बोलते केले असता असा प्रकार होऊच शकत नसल्याची प्रतिक्रिया मिळाली. 

गणेश निर्दोषच

गणेश कपाळेचे आई-वडील तसेच अन्य नातेवाईकांसोबत भेट घेतली असता त्यांनी गणेश निर्दोष असल्याचे सांगितले. झेरॉक्स व डीटीपीसाठी कोणीही येऊ शकते. तो व्यवसायाचा भाग आहे.  गणेश कोणत्याही कटात अथवा गैरप्रकारात सहभाग घेऊच शकत नसल्याचा  दावा वडील मधुकरराव कपाळे यांनी केला.