Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Jalna › तप्त उन्हात शेतकरी पुन्हा शेतात

तप्त उन्हात शेतकरी पुन्हा शेतात

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 11:12PMमंठा : प्रतिनिधी 

मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासोबतच यंदा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा जुने दु:ख विसरून सध्या तरी आनंदात आहे. मागील दोन-तीन वर्षांचे नुकसान विसरून तो पुन्हा नव्या उमेदीने मान्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. पारा 41अंशांंपार गेला आहे, तरीही बळीराजा तप्त उन्हात पुन्हा आपल्या शेतात दिसू लागला आहे.

मागील दोन वर्षे सातत्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. खरिपाने शेतकर्‍यांना दगा दिला. मागील वर्षी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरिपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की, जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पावसाचे आगमन झाले नाही. त्यानंतर पाऊस बरसला आणि शेतकर्‍यांनी पिकांची लगबगीने पेरणी केली. मात्र नंतर पावसाने अनेक वेळा शेतकर्‍यांना दगा दिला. परिणामी शेतकर्‍यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. काही शेतकर्‍यांनी कशीबशी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कापसावर बोंडअळी आणि सोयाबीन, मूग, उडीद मावा-तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. संपूर्ण पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले. त्यामुळे पाहिजे तसे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालास भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत आहे. शेतातील कचरा, अनावश्यक झुडुपे तोडणे, बांध तयार करणे, शेण खत टाकणे, नांगर, वखर व्यवस्थित करणे आदी कामे होत आहेत.