Wed, Sep 19, 2018 14:27होमपेज › Jalna › ‘शिवशाही’त लोकप्रतिनिधींना सूट, ज्येष्ठांची लूट

‘शिवशाही’त लोकप्रतिनिधींना सूट, ज्येष्ठांची लूट

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:28AMभोकरदन : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाची आरामदायक बस शिवशाहीमध्ये खासदार, आमदारांना नि:शुल्क प्रवास करण्याची सूट देण्यात आली. मात्र ज्येष्ठ नागरिकांसह, अंध, अपंगांना कोणतीही सवलत दिली नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या या धोरणाबाबत ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र रोष असून शिवशाहीत आमदारांना सूट, ज्येष्ठ, दिव्यांगांची लूट अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

शिवशाही महागडी असल्याच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी असतानाच ज्येष्ठ नागरिकांनी साधारण व एशियाडप्रमाणे या बसच्या तिकिटांमध्ये सवलत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करून आम्ही ज्या एसटीला आपले मानतो तिचे दर जर खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे असतील, तर मग महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये अन् खासगी ट्रॅव्हल्समध्ये अंतर ते कोणते? असा प्रतिप्रश्‍न महामंडळ अधिकार्‍यांना विचारला जात आहे. राज्यभरात महानगरांपर्यंत मोठ्या दिमाखात धावत असलेल्या शिवशाहीमध्ये आरामदायक प्रवास करण्यापासून आम्हाला वंचित का ठेवले जात आहे? याआधी एसटीतून आम्ही राज्यभरात प्रवास करत होतो. आम्हाला सर्वसाधारण लाल बस आणि एशियाडमध्ये अर्धे तिकीट लागायचे.

 मात्र शिवशाहीपासून आम्हाला वंचित ठेवले जात आहे. सर्वच ज्येष्ठ नागरिकांना सामान्य बसच्या तिकिटांपेक्षा 80 ते 100 रुपये दर जास्त देऊन शिवशाहीतून प्रवास करणे परवडत नाही.
 त्यामुळे ते शिवशाहीने प्रवास करणे टाळतात. मात्र, शिवशाहीत दिव्यांगांना सूट नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एस.टी.महामंडळाविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे. राज्यभरात शिवशाहीचा मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक आगारातून ही शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे. मात्र, ज्येष्ठ व दिव्यागांना यामध्ये सवलत देण्यात न आल्याने प्रवाशातून एसटी विषय नाराजी व्यक्‍त होत आहे.